किशोर सुधारालयातील बारा गुन्हेगारांचे पलायन
By Admin | Updated: January 12, 2016 00:35 IST2016-01-12T00:34:38+5:302016-01-12T00:35:34+5:30
कारागृह महानिरीक्षकांची भेट : दोन कर्मचारी निलंबित

किशोर सुधारालयातील बारा गुन्हेगारांचे पलायन
नाशिक : शहरातील मध्यवर्ती मेळा बसस्थानकासमोर असलेल्या किशोर सुधारालयातील बारा अल्पवयीन गुन्हेगारांनी बराकीचे गज कापून, मानवी मनोरे व चादरीच्या साहाय्याने दोर बनवून सुमारे वीस फुटांची दगडी भिंत पार करून पलायन केल्याची घटना सोमवारी (दि़ ११) पहाटेच्या सुमारास घडली़ या गुन्हेगारांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली असून, यापैकी दोघांना पुण्यातील निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ दरम्यान, या घटनेनंतर पुणे येथील कारागृह महानिरीक्षकांनी किशोर सुधारालयास भेट देऊन हवालदार राजेंद्र झाल्टे व शिपाई भास्कर भगत या दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत़
मेळा बसस्थानकासमोरील किशोर सुधारालयात बाल न्यायालयाने शिक्षा सुनावलेले विविध गंभीर (पान ७ वर)
गुन्ह्यातील राज्यभरातील २६ अल्पवयीन गुन्हेगार आहेत़ सोमवारी पहाटेच्या तीन वाजेच्या सुमारास १२ गुन्हेगारांनी बराकीचे गज कापून पांघरण्यासाठी दिलेल्या चादरी व कपडे यांच्या साहाय्याने दोर तयार केला़ यानंतर मानवी मनोऱ्याच्या साहाय्याने सुमारे वीस फुटांची दगडी भिंत पार करून ते पळून गेले़ यामध्ये पुणे येथील नऊ, सातारा येथील दोन, तर मुंबईतील एका अल्पवयीन गुन्हेगाराचा समावेश आहे़
किशोर सुधारालयातून फरार झालेले गुन्हेगार १७ ते १९ वर्षे वयोगटातील असून, त्यामध्ये खुनाच्या गुन्ह्यातील तीन, जबरी चोरीतील तीन, जबरी लुटीतील एक, तर चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा झालेले पाच गुन्हेगार आहेत़ सोमवारी दुपारी पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक डॉ़ भूषण कुमार उपाध्याय यांनी किशोर सुधारालयास भेट देऊन घटनेची चौकशी केली़ तसेच रात्रपाळीतील कर्मचारी हवालदार राजेंद्र झाल्टे व शिपाई भास्कर भगत यांच्या निलंबनाचे आदेश दिले़
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन, किशोर सुधारालयाचे तुरुंग अधिकारी विलास साबळे, पोलीस उपायुक्त एऩअंबिका यांनी किशोर सुधारालयात धाव घेतली होती़ दरम्यान, पलायन केलेल्या बालगुन्हेगारांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.