ठळक मुद्दे शौनकाश्रम येथे २१फुटी गुढी उभारण्यात आली ‘उंच उभारू माणुसकीची गुढी राम असलेली घडेल पुन्हा एक पिढी’

नाशिक : अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडत असताना श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या रामभूमी नाशकातही भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अनेक घरांवर भगवे ध्वज फडकत असून अंगणामध्ये रांगोळ्या रेखाटल्या गेल्या आहेत. राम मंदिरांमधून ‘जय श्रीराम’चे घोष ऐकू येत असून घंटानाद व शंखध्वनी सुरू आहेत, अवघे जन रामरंगी रंगले आहे. तपोवन, पंचवटी, रामकुंड, काळाराम मंदीर परिसरात भक्तीमय वातावरण पहावयास मिळत आहे.


भगवान श्रीराम यांनी आपला वनवास काळ नाशिकच्या पंचवटी दंडकारण्यात व्यतित केल्याचे दाखले इतिहासात व पुराणात आढळतात. नाशिकमध्ये जागोजागी त्याच्या खुणाही आढळतात, म्हणूनच अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे भूमिपूजन होत असताना नाशिकच्या गल्लोगल्ली श्रीरामाचा जयघोष होत आहे. पंचवटी व तपोवनातील मंदिरांवर रोषणाई केली गेली असून प्रभू राम यांचे स्नान स्थान म्हणून प्रख्यात असलेल्या रामकुंडावर घंटानाद सुरू झाला आहे. नाशिक पूरोहित संघ, विश्व हिंदू परिषद यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी रामकुंडावर जमा झाले असून तेथे आरती व राम घोष केला जात आहे. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल तसेच अन्य अनेक मान्यवर तेथे उपस्थित आहेत.
प्रख्यात काळाराम मंदिरात सार्वजनिक दर्शनाला बंदी असली तरी गाभाऱ्यात मंदिराच्या पुजाऱ्यांकडून पुजाविधी केला जात आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजा वर माजी पालकमंत्री गिरीश महाजन पंचवटीचे आमदार अ‍ॅड राहुल ढिकले आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Web Title: Enthusiasm of devotees reached Rambhoomi Nashik; Saffron flags fluttered on houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.