लखमापूर परिसरात मतदारांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 01:11 IST2021-01-15T21:41:51+5:302021-01-16T01:11:16+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे जाणवत होते.

लखमापूर परिसरात मतदारांमध्ये उत्साह
लखमापूर येथील १० जागांसाठी २१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १३ असून, तीन महिला उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे १० जागांसाठी निवडणूक होत असून, २१ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात निवडून येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. संपूर्ण दिंडोरी तालुक्याचे लखमापूर ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. येथील पाच प्रभागांमधील १० जागांसाठी एकूण ३,०६७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १,६०१ तर महिला मतदारांची संख्या १,४६६ इतकी आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पाचही मतदान केंद्रांमध्ये मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. वाडी, वस्तीवरील मतदारांना मतदानासाठी आणण्याकरिता प्रत्येक उमेदवाराने विशेष गाड्यांची व्यवस्था केली होती. यावेळच्या निवडणुकीत प्रथमच तरुण उमेदवार मोठ्या संख्येने उतरले आहेत.