एकलहरे केंद्रात आठवडाभर पुरेल इतकाच कोळसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:10 IST2021-03-30T04:10:47+5:302021-03-30T04:10:47+5:30
नाशिक : येथील नाशिक औष्णिक वीज केंद्राने गेल्या महिनाभरात वीज उत्पादनात सातत्य ठेवले असून, येथील संच कालबाह्यतेच्या उंबरठ्यावर असूनही ...

एकलहरे केंद्रात आठवडाभर पुरेल इतकाच कोळसा
नाशिक : येथील नाशिक औष्णिक वीज केंद्राने गेल्या महिनाभरात वीज उत्पादनात सातत्य ठेवले असून, येथील संच कालबाह्यतेच्या उंबरठ्यावर असूनही पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन करीत आहेत. मात्र, सध्या आठवडाभर पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक आहे.
एकलहरे केंद्रात २१० मेगावाटचे तीन संच कार्यान्वित आहेत. त्यांची क्षमता ६३० मेगावाट आहे. त्यातील एका संचाचा कोळसा खासगी कंपनीला वर्ग करण्यात आला आहे. उर्वरित दोन संचांची क्षमता ४२० मेगावाट आहे. त्यातून गेल्या महिनाभरात रोज ३५० मेगावाटच्या जवळपास वीज उत्पादन होत आहे. येथील संच कालबाह्य होण्याच्या मार्गावर असले, तरी अजूनही आपली कार्यक्षमता टिकवून आहेत.
या संचांचे आर अँड एम (रिनोव्हेशन अँड मॉडर्नायझेशन) केल्यास त्यांची कार्यक्षमता आणखी वाढू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. ग्रीड स्टॅबिलिटीच्या दृष्टीनेही नाशिकचे वीज केंद्र सातत्याने सुरू राहणे गरजेचे असून, येथील मुख्य अभियंता व कर्मचाऱ्यांनी या कामी घेतलेल्या परिश्रमामुळे औष्णिक वीज केंद्राची गुणवत्ता टिकून आहे. त्यासाठी कोळशाची प्रतवारीही चांगली असून, आठवडाभर पुरेल एवढा कोळसा शिल्लक आहे.