पोटनिवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी उद्या संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:11 IST2018-04-03T15:11:15+5:302018-04-03T15:11:15+5:30
प्रभाग क्रमांक १३ : मनसे, सेना व भाजपामध्ये तिरंगी सामना
पोटनिवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी उद्या संपणार
नाशिक - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) च्या पोटनिवडणुसाठी येत्या शुक्रवारी (दि.६) मतदान घेण्यात येणार असून बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजता प्रचाराची रणधुमाळी संपणार आहे. पोटनिवडणुकीत मनसे, सेना आणि भाजपा उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत आहे. दरम्यान, मतदानाची तयारी प्रशासनामार्फत सुरू असून मंगळवारी (दि.३) २५० कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रभाग क्रमांक १३ (क)मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी दि. ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीत मनसेकडून अॅड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या स्नेहल संजय चव्हाण आणि भाजपाच्या विजया हरिष लोणारी या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे. याशिवाय, राष्टवादीच्या बंडखोर उमेदवार व माजी नगरसेवक रंजना ज्ञानेश्वर पवार यांनी देखील अपक्ष उमेदवारी करत आव्हान दिले आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार अवंतिका घोडके यांनी शिवसेनेत प्रवेश करत आपली तलवार म्यान केली आहे. ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार असल्याने बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे. त्यामुळे, अखेरच्या टप्प्यात प्रचाराला वेग आला असून उमेदवारांकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला जात आहे. मोठ्या प्रमाणावर प्रचार पत्रकांचेही वाटप करत मतदारांना आपली भूमिका समजावून सांगितले जात आहे. मनसेसह भाजपाने मतदानाच्या दिवशी बूथवर प्रतिनिधींच्या नियुक्त्या केल्या असून मतदान स्लिपांचेही वाटप बुधवारी-गुरुवारी केले जाणार आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण ४७ हजार २२८ मतदार असून, त्यात २४ हजार १४० पुरुष तर २३ हजार ८८ स्त्री मतदार आहेत. मतदानासाठी प्रभागात ६१ बूथ उभारले जाणार आहेत.
मतदान कर्मचा-यांचे प्रशिक्षण
दि. ६ एप्रिल रोजी होणा-या मतदानासाठी प्रशासनाने मंगळवारी (दि.३) २५० कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेतले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक अधिकारी रोहिदास बहिरम यांनी मार्गदर्शन केले. दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पुन्हा एकदा प्रशिक्षण घेतले जाणार असून त्यानंतर मतदान साहित्याचे वाटप केले जाणार आहे. मतदानाकरीता प्रशासनाने ७० इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन उपलब्ध केले आहेत. त्यातील ९ मशिन राखीव ठेवले जाणार आहेत. दि. ६ एप्रिलला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होऊन दि. ७ एप्रिलला गंगापूररोडवरील शिवसत्य कला व क्रीडा मंडळाच्या मैदानावर मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.