काकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पुतण्याला सक्तमजुरी
By Admin | Updated: February 28, 2017 01:21 IST2017-02-28T01:20:51+5:302017-02-28T01:21:10+5:30
काकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पुतण्याला सक्तमजुरी

काकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पुतण्याला सक्तमजुरी
नाशिक : शेतात मिरचीचे रोप लावण्याच्या कारणावरून काका-काकूला पुतण्याने मोगरीने केलेल्या मारहाणीत काकाचा मृत्यू झाल्याची घटना कळवण तालुक्यातील माळगाव येथे २०१५ ला घडली होती़ जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात न्यायाधीश एऩ के.ब्रह्मे यांनी आरोपी राजेंद्र भाऊराव गायकवाड (२६, रा़ माळगाव, ता़ कळवण, जि़ नाशिक) या पुतण्याला मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोषी ठरवत सोमवारी (दि़२७) आठ वर्षे सक्तमजुरी व चौदा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़
नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी १२ साक्षीदार तपासले़ या साक्षीदारांमध्ये मयत गुलाब गायकवाड यांची पत्नी रजूबाई व व एका नऊ वर्षांच्या मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली़ न्यायालयाने फिर्यादी व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद तसेच समोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार आरोपी राजेंद्र गायकवाड यास मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३०४(२) अन्वये आठ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड तर भारतीय दंड विधान कलम ३२४ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व चार हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेत आरोपी राजेंद्र गायकवाड याने काँक्रीट शिक्षा भोगावयाच्या असून, दंडाच्या रकमेतील दहा हजार रुपये फिर्यादी रजूबाई गायकवाड यांना देण्यात यावे, असे म्हटले आहे़ या खटल्यातील आरोपी राजेंद्र गायकवाड हा घटना घडल्यापासून कारागृहात आहे़ (प्रतिनिधी)