बदल्या रोखण्यासाठी सरसावल्या कर्मचारी संघटना
By Admin | Updated: April 8, 2015 01:18 IST2015-04-08T01:17:54+5:302015-04-08T01:18:27+5:30
सिंहस्थाचे कारण देत प्रशासकीय बदल्या टाळण्याची खेळी

बदल्या रोखण्यासाठी सरसावल्या कर्मचारी संघटना
नाशिक : दरवर्षाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदली व जिल्हांतर्गत बदली धोरण निश्चित करण्यासाठी शासन स्तरावरून सूचना मागविण्यात आल्या असून, त्याचाच फायदा घेत काही कर्मचारी संघटनांच्या पुढाऱ्यांनी प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी सिंहस्थांचे कारण देण्याची खेळी करण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या आंतर जिल्हा बदलीबाबत २९ सप्टेंबर २०११च्या शासन परिपत्रकान्वये तसेच जिल्हांतर्गत बदलीसाठी १५ मे २०१४च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक तत्त्वे विहित केली आहेत. शासनस्तरावरून निश्चित केलेल्या धोरणानुसार बदल्यांची कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर पूर्ण करण्यात येते. तसेच ही कार्यवाही विहित कार्यपद्धतीनुसार न झाल्यास विभागीय आयुक्तांकडे दाद मागता येते. त्यामुळेच ३० मार्च २०१५च्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय कार्यालयातील उपआयुक्तांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार आंतर जिल्हा व जिल्हांतर्गत धोरणाबाबत अद्यापही काही सुधारणा करणे आवश्यक आहे किंवा कसे, आवश्यक असल्यास त्यासंदर्भात निश्चित अपेक्षित सुधारणा व त्यासंदर्भातील विनिर्दिष्ट स्पष्ट अभिप्राय शासनास सादर करण्यात यावेत, असे या परिपत्रकात म्हटले आहे