द्राक्ष उत्पादकांकडून घरगुती बेदाणा निर्मितीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 13:41 IST2020-04-04T13:41:29+5:302020-04-04T13:41:36+5:30
चांदोरी : कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉकडाउन असल्याने द्राक्ष उत्पादन मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटात व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

द्राक्ष उत्पादकांकडून घरगुती बेदाणा निर्मितीवर भर
चांदोरी : कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉकडाउन असल्याने द्राक्ष उत्पादन मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटात व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच बेदाणा व्यापारीही टाळाटाळ करत आहेत. अशा स्थितीत चांदोरी येथील द्राक्ष उत्पादकाने घरगुती बेदाणा तयार करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनामुळे सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. द्राक्ष निर्यात थांबल्याने शेतात झाडावरच द्राक्षे पडून आहेत. व्यापारी वर्गानेही पाठ फिरवली आहे. तर काही व्यापारी अगोदर झालेले व्यवहार रद्द करत आहेत. शिवाय बेदाणा व्यापारी सुद्धा द्राक्ष नेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. चांदोरी येथील रविराज भोर यांचा दीड एकर द्राक्ष बाग मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोलमडून मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी त्यांनी सद्य परिस्थिती आणि बंद असलेली बाजारपेठ लक्षात घेता यावर उपाय शोधला. त्यांनी सर्व कुटुंबातील सदस्य मिळून द्राक्ष काढले आणि कुठल्याही व्यापाऱ्यांकडे न जाता स्वत:च घरी बेदाणा बनविण्यासाठी तयारी केली आहे. त्यासाठी लागणारी रसायने व इतर साहित्य त्यांनी उपलब्ध करून घेतले आहे.