Emphasis on cultivating onion of farmers | शेतकऱ्यांचा कांदा लागवडीवर जोर

शेतकऱ्यांचा कांदा लागवडीवर जोर

ठळक मुद्देअपेक्षा : दर टिकून असल्याने समाधान; रोपांना मागणी वाढली

मानोरी : यंदा समाधानकारक पडलेला पाऊस आणि कांद्याचे टिकून असलेल्या दरामुळे येवला तालुक्यातील शेतकरी कांदा लागवडीवर जोर देताना दिसून येत आहेत. त्यातच अनेक शेतकर्यांचे पीक अवकाळी पावसाने दोन ते तीन वेळी पाण्यात गेले असले तरी भविष्यात चांगला दर मिळेल या आशेने मिळेल त्या भावाने कांदा रोपे खरेदी करत असल्याचे पहावयास मिळत आहे.
येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, जऊळके, जळगाव नेउर, शिरसगाव, पिंपळगाव लेप आदी परिसरातील शेतकरी जानेवारी महिना संपत आला असतानाही उन्हाळ कांदा लागवडीत व्यस्त आहेत. कांद्याचे माहेर घर म्हणून ख्याती असलेल्या येवला तालुक्यात यंदा अवकाळी पावसाने कांद्याचे रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. तर दुसरीकडे कांद्याचे भाव गगनाला भिडले असल्याने महागड्या दराने का होईना कांद्याचे रोपे अजूनही शेतकरी वर्ग खरेदी करून कांदा लागवड करत आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात उन्हाळ कांदा लागवड आटोपलेली असते. मात्र, यंदा चालू हंगामात परतीच्या पावसाने जोरदार आगमन करत खरीप हंगामातील पिकांची नासाडी केली.
यात मोठ्या अपेक्षेप्रमाणे कांद्याची टाकलेली रोपेसुद्धा अवकाळी पावसाने होत्याची नव्हती करून टाकली. अवकाळी पावसाने तब्बल तीनदा रोपे टाकूनही ही रोपे सडून गेल्याने शेतकर्यांना स्वत:च्या मालकीची रोपे कांदा लागवडीसाठी राहिली नव्हती. तरीही कांदा लागवड करण्यासाठी सध्या शेतकर्यांना कांद्याच्या रोपाला महागडा भाव द्यावा लागत आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे कांदा लागवडीकडे शेतकरी वर्गाने जास्त भर दिला
आहे. एकीकडे घरची रोपे सडून गेली तर दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडत असल्याने महागड्या किमतीने का होईना मिळेल तेथून रोपे घेऊन कांदा लागवडीसाठी शेतकरी वर्गाची जणू लगीन् घाईच सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

औषध फवारणीचा खर्च वाढला; मजुरांना आले सुगीचे दिवस
येवला तालुक्यात मागील दीड महिन्यापासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाल्याचे दिसून आले आहे.वातावरण बदलामुळे कांद्यावर अधून मधून विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने वारंवार औषध फवारणी करावी लागत आहे.त्यामुळे नवीन कांदा लागवड धोक्यात आली असून लागवड केलेल्या कांद्याला वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

येवला तालुक्यातील मुखेड, मानोरी बुद्रुक, चिचोंडी, नेऊरगाव, देशमाने, जळगाव नेऊर, एरंडगाव आदी भागात कांदा लागवडीसाठी मजूर वर्गाची वानवा भासत आहे. मजूर वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी विकत घेतलेले रोपे खराब झाली आहेत. सध्या कांदा लागवडीचा प्रती एकर तब्बल आठ ते नऊ हजार रु पयांपर्यंत पोहचला असून मजूर वर्गाला मोठी मागणी होत असल्याचे दिसून येत आहे.

यंदा कांद्याचे दर टिकून असल्याने उन्हाळ कांदा लागवड देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवकाळी पावसाने रोपांचे नुकसान झाल्याने आता कांदा लागवडीसाठी अत्यंत महागड्या दराने कांद्याची रोपे खरेदी करावी लागत आहे. बदलत्य वातावरणाने औषध फवारणी करण्याचा खर्च वाढला आहे. कांदा काढणीला आल्यानंतर भाव मिळतो की नाही याची शाश्वती नसल्याने धाकधूक वाढली आहे.
- संदीप वावधाने, कांदा उत्पादक, मानोरी बु.

Web Title: Emphasis on cultivating onion of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.