निऱ्हाळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चौक बैठकांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 17:19 IST2020-12-21T17:18:20+5:302020-12-21T17:19:00+5:30
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून वॉर्डनिहाय हालचाली गतिमान झाल्या आहेत. चौकाचौकांत बैठका घेऊन मोर्चेबांधणी केली जात आहे.

निऱ्हाळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चौक बैठकांवर भर
कोरोनाच्या संक्रमणामुळे निवडणुका पुढे ढकलून ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. तेव्हापासून ग्रामपंचायत निवडणुका केव्हा होणार याकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष लागले होते. स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने व गावपातळीवर आपल्याच हातात पंचायतीचा कारभार राहावा, यासाठी ज्येष्ठ नागरिक व युवक यांच्याकडून व्यूहरचना आखली जात आहे. सध्या राजकीय वातावरण तापले असून, गावातील पारावर, हॉटेल, दूध डेअरी, किराणा दुकान अशा गर्दी जमणाऱ्या ठिकाणी बैठका घेऊन वातावरणनिर्मिती केली जात आहे. नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत ५ महिला व ४ पुरुषांच्या जागा आहेत. यंदा सरपंचपद महिलांसाठी राखीव निघण्याची शक्यता असल्याने काही चाणाक्ष पुढारी त्यादृष्टीने प्रयत्न व चाचपणी करीत असल्याचे दिसून येत आहे.