Nashik Municipal Corporation: आयुष्यभर पक्ष पक्ष करीत राहिलात, शेवटी काय मिळाले, आता पक्षाकडून काही पद मिळाले नाही तर मी घर सोडून जाईल, असे पत्र उद्धवसेनेच्या एका इच्छुकाला त्याच्या पत्नीने लिहिले असून त्याने ते पत्र चक्क पक्षाच्या नेत्यांकडे पाठवले आहे. आगामी महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपल्याला संधी द्या, अन्यथा वैवाहिक जीवन धोक्यात येईल, असे पत्र त्याने दिल्याचे वृत्त आहे. सध्या पक्षात हा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे उद्धवसेनेतील एका नेत्याच्या मुलाला देखील स्वीकृत नगरसेवक व्हायचे असून त्याने पद न मिळाल्यास घर सोडून जाण्याचा इशारा दिल्याने त्याला संधी मिळावी, यासाठी संबंधित नेता पाठपुरावा करीत आहे. आता घर सोडून जाणार याच निकषावर पक्ष निर्णय घेणार की काय, अशी उत्सुकता सामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत उद्धवसेनेचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. अनेक सक्षम उमेदवार पराभूत झाले आहेत. मात्र, आता स्वीकृत नगरसेवकपदासासाठी असे पराभूत झालेले पदाधिकारी किंवा त्यांच्या पत्नी देखील दावेदार आहेत. त्यामुळे पक्षा समोर अडचण असतानाच आता पक्षासमोर नवीन संकट उभे राहिले आहे.
एका नेत्याच्या मुलाला महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देता आली नाही. कारण भाजपतून आलेल्या नेत्याला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उद्धवसेनेच्या नेत्याच्या नाराज मुलाने घर सोडून अन्यत्र राहण्यास गेला आणि इच्छुक उमेदवार म्हणून पत्रके वाटप सुरू केले होते. त्याची कशी तरी समजूत काढण्यात आली.
..तर नेत्याचा मुलगा घर सोडून जाईल
आता त्याला स्वीकृत नगरसेवकपदी संधी मिळाली नाही तर तो घर सोडून जाईल, अशी भीती संबंधित नेता पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त करीत आहेत. आता अशाच निकषावर पक्षातील एका पदाधिकाऱ्याने नवीन शक्कल लढवली आहे. या 'निष्ठावान' कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त होण्याची इच्छा आहे. मात्र, त्याला त्याच्या पत्नीने एक पत्र दिले असून आयुष्यभर पक्षासाठी काम केले. आता पक्षाकडून काही पद मिळत नसेल तर घर सोडून जाणार असल्याचे नमूद केले आहे, हे पत्रच त्याने पक्षाच्या मुंबईतील नेत्याला पाठवले असून, स्वीकृत करण्यासाठी कळकळीची विनंती केली.
तज्ज्ञांच्या नियुक्तीचे काय?
महापालिकेत स्वीकृत नगरसेवक ही संकल्पना उच्च विद्याविभूषित आणि महापालिकेला तज्ज्ञांचा सल्ला मिळावा, यासाठी आहे. ज्याप्रमाणे विधानपरिषद किंवा राज्यसभेत सदस्य नियुक्त होतात, तशीच संकल्पना आहे. संबंधित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाला लाभ होणे अपेक्षित आहे. मात्र, येथे राजकीय वर्णी लावण्यासाठी अशा वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी पक्ष योग्य तो निर्णय घेईल; परंतु अशाप्रकारचे कोणी वरिष्ठांना पत्र पाठवले किंवा काय माहिती नाही, असे उद्धवसेनेचे नेते माजी आमदार वसंत गिते यांनी सांगितले.
Web Summary : Uddhav Sena aspirant's wife threatens to leave if he doesn't get a council seat. Another leader's son also threatens to leave home if denied. Party leaders are in a fix, considering unusual requests for the position.
Web Summary : उद्धव सेना के एक कार्यकर्ता की पत्नी ने पार्षद पद न मिलने पर घर छोड़ने की धमकी दी। एक अन्य नेता के बेटे ने भी पद न मिलने पर घर छोड़ने की धमकी दी है। पार्टी नेता अजीब अनुरोधों से परेशान हैं।