नाशिक : कोरोनाच्या भयावह वाढत्या रुग्णसंख्येसह बुधवारी झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऑक्सिजनची समस्या गुरुवारी अधिकच बिकट झाली आहे. जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन संपुष्टात आला, तर काहींचा केवळ चार-पाच तासांपुरताच ऑक्सिजन उरल्याने त्यांना रुग्ण जागा मिळेल तिथे स्थलांतरित करण्याची वेळ आली. तर अनेक खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजनअभावी ऑक्सिजन बेड लागणारे नवीन रुग्णच दाखल करून घेणे थांबवले असून ही मोठी आणीबाणीची वेळ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आली आहे.
ऑक्सिजन पुरवठ्याच्या समस्येत शासकीय रुग्णालये, मनपा रुग्णालये, मालेगाव मनपा रुग्णालये आणि खासगी रुग्णालये असा सर्व यंत्रणांशी समन्वय राखणे फारच अवघड झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजनासाठी तीन स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. तरीदेखील नियोजन आणि मागणीनुसार पुरवठ्याचा अभाव असल्याने अनेक गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयातही ऑक्सिजन बेडच मिळेनासे झाले आहेत.
इन्फो
प्रकल्पांनाच लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा
नाशिकला लागणाऱ्या ऑक्सिजनसाठी पुणे जिल्ह्यातील चाकण आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे लिक्विड ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून दररोज मागवावा लागत आहे. तिथून ऑक्सिजनचा पुरवठा नाशिकच्या रिफिलिंग प्रकल्पाला होतो. तसेच दररोज ऑक्सिजनसाठी टँकर्सना किमान १२ ते १५ तास असलेली प्रतीक्षा आता ३० तासांवर गेली आहे. त्यामुळे एक टँकर यायलाच दीड दिवसांहून अधिक वेळ लागत असल्याने ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा यात सातत्य उरलेले नाही.
इन्फो
उपलब्ध कच्चा मालच कमी झाल्याने समस्या तीव्र
जिल्ह्यात ऑक्सिजनचे आठ उत्पादक असून, त्यातील तीन उत्पादक तर अन्य पाच जण रिफिलर आहेत. मात्र या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसह रिफिलिंग करणाऱ्यांकडेच लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने त्यांच्याकडून पुरवठाच कमी होऊ लागला असल्याने सर्वाधिक समस्या निर्माण झाली आहे.
---------------------