ंरमजानमध्ये शिक्षकांचे वेतन रखडल्याने नाराजी
By Admin | Updated: June 12, 2017 00:28 IST2017-06-12T00:26:41+5:302017-06-12T00:28:59+5:30
संतप्त प्रतिक्रीया : शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन सादर

ंरमजानमध्ये शिक्षकांचे वेतन रखडल्याने नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
आझादनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत रोकडच उपलब्ध नसल्याने चार महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे पैशांअभावी शिक्षकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. म्हणून शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बॅँकेमार्फत करावे, अशी मागणी मालेगाव मध्यचे आमदार आसिफ शेख यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनाही देण्यात आले आहे.
याबाबत जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांकडून वेगवेगळ्या स्तरावर आंदोलन, उपोषण सुरू आहेत. तशा आशयाचे निवेदनही जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात येत आहेत. मात्र अद्यापपावेतो शासनाकडून शिक्षकांची आर्त मागणी असलेल्या वेतन अदा करणेबाबत कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही. ही बाब अत्यंत चिंतनीय आहे. यापूर्वी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीयकृत बॅँकेत खाते उघडून वेतनाची समस्या निकाली काढण्यात आली आहे, असे असताना पुन्हा शासनाकडून नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांसोबत सावत्र वागणूक दिली जात आहे. म्हणून शासनाने सर्वांना समान न्याय देत जिल्ह्यातील शिक्षकांना राष्ट्रीयकृत बॅँकेमार्फत वेतन अदा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे साजीद अहमद उपस्थित होते.गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा बॅँकेत वेतन अडकले आहे. जिल्ह्यासह मालेगाव शहरातील शिक्षकांना हलाखीच्या परिस्थितीतून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. अशा सणासुदीच्या दिवसातही शिक्षकांना दयनीय परिस्थितीशी सामना करावा लागत आहे.