वाढत्या भारनियमनाविरोधात एल्गार
By Admin | Updated: September 13, 2015 23:38 IST2015-09-13T23:37:24+5:302015-09-13T23:38:35+5:30
निवेदन : सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

वाढत्या भारनियमनाविरोधात एल्गार
पेठ : शहरासह तालुक्यात बाराही महिने होणाऱ्या भारनियमनाला वैतागलेल्या जनतेने आता थेट वीज वितरण कंपनीच्या विरोधात बंड पुकारले असून याबाबत सुधारणा न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे़
पेठसह तालुक्यात बाराही महिने बारा बारा तास भारनियमन होत असताना तसेच नाशिकहून पेठ येथे येणारी वीजलाइन कमकुवत झाली असतानाही वीज वितरण कंपनी याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन सुधारणा करण्याची मागणी केली़
याशिवाय अपुऱ्या पावसामुळे पेठ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जलसंधारणाची कामे सुरू करावीत, एकात्मिक पाणलोट विकास योजना सुरू करावी, शेतकऱ्यांना वीजबिल माफ करावे, स्वस्त धान्य वितरण व्यवस्था सुरळीत करावी, नद्याजोड प्रकल्प रद्द करावा आदि मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार झिरवाळ यांना देण्यात आले़ यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर गावित, कॉँग्रेसचे विठोबा भोये, माकपाचे देवराम गायकवाड, राष्ट्रवादीचे दामू राऊत, बाजार समितीचे संचालक श्यामराव गावित, मोहन पवार, रामदास वाघेरे, यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्तेे उपस्थित होते़