वावीसह अकरा गाव पाणी योजनेच्या बैठकीला ग्रामसेवकांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:08+5:302021-09-04T04:18:08+5:30
सिन्नर : वावीसह अकरा गावे पाणीपुरवठा योजनेच्या पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीस योजनेत समाविष्ट असलेल्या ग्रामसेवकांनी दांडी मारल्याने बैठकीत ...

वावीसह अकरा गाव पाणी योजनेच्या बैठकीला ग्रामसेवकांची दांडी
सिन्नर : वावीसह अकरा गावे पाणीपुरवठा योजनेच्या पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीस योजनेत समाविष्ट असलेल्या ग्रामसेवकांनी दांडी मारल्याने बैठकीत ठोस निर्णय घेता आला नाही. अनुपस्थितीत ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी देत त्यांना अनुपस्थितीबाबत नोटीस काढण्यात आल्या आहेत. तालुक्याच्या अवर्षणग्रस्त वावी परिसरासाठी ही पाणी योजना संजीवनी ठरली आहे. मात्र, सध्या योजनेची वसुली पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, जलशुध्दीकरण करण्यासाठी लागणारे साहित्य आदिंसह विविध कामांसाठी पैशांची गरज आहे. योजना सुरळीत चालावी, यासाठी वावीसह अकरा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची बैठक गटविकास अधिकारी मुरकुटे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष विजय काटे व सचिव नितीन मेहेरखांब वगळता योजनेत समाविष्ट गावांपैकी एकाही गावाचे ग्रामसेवक हजर न राहिल्याने गटविकास अधिकारी मुरकुटे यांनी संबंधित ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. ग्रामसेवकांना दिलेल्या नोटीसीत मुदतीत खुलासा न केल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४चा नियम ४ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी मुरकुटे यांनी सांगितले.
---------------------------
बैठक आयोजनाच्या हेतूला हरताळ
वावीसह पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक, वारेगाव, सायाळे, मलढोण, मिरगाव, दुशिंगवाडी, कहांडळवाडी, शहा, मीठसागरे आदी गावांना या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा कशा प्रकारे होतो व संबंधित गावांची पाणीपट्टी थकल्या कारणाने योजना चालवणे अशक्य होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास योजना बंद पडू शकते. त्यामुळे थकीत पाणीपट्टी करवसुली व पाणीपुरवठ्याचा वसुलीतील अडथळे यासंदर्भाने अध्यक्ष, सचिव व सदस्यांची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, ग्रामसेवकांनी दांडी मारल्याने बैठक आयोजनाच्या हेतूला हरताळ फासला गेला असल्याची चर्चा आहे.
---------------------
योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्रातील टीसीएल पावडरचा साठा संपुष्टात आला आहे. कर्मचाऱ्यांचे पगारदेखील करायचे आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकांनी हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे होते. कोणीही ग्रामसेवक मुख्यालयात राहात नसल्याने कोणाही नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नांशी देणेघेणे नसल्याचे दिसते. थकीत कर तातडीने वसूल करून पाणीपुरवठा समितीकडे वर्ग करावा.
-विजय काटे, अध्यक्ष, वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा समिती