अकरा प्रशिक्षणार्थी युवक-युवतींना हॉटेलमध्ये बळजबरीने डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:08+5:302021-02-05T05:38:08+5:30
याबाबत मिळालेली माहिती अशी, पाथर्डीफाटा परिसरात एका नामांकित हॉटेलमध्ये अकरा युवक व युवतींना बळजबरीने डांबून ठेवत त्यांनी काम ...

अकरा प्रशिक्षणार्थी युवक-युवतींना हॉटेलमध्ये बळजबरीने डांबले
याबाबत मिळालेली माहिती अशी, पाथर्डीफाटा परिसरात एका नामांकित हॉटेलमध्ये अकरा युवक व युवतींना बळजबरीने डांबून ठेवत त्यांनी काम सोडून जाऊ नये, यासाठी हॉटेलच्या व्यवस्थापनाकडून दबाव आणला जात होता. याबाबतची माहिती थेट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मिळाली. डांबून ठेवलेल्या युवा कामगारांपैकी एका युवतीने आपल्या मुंबईस्थित मैत्रिणीला सुटका करण्यासाठी साकडे घातले होते. या मैत्रिणीने थेट आव्हाड यांना हा प्रकार लक्षात आणून दिला. यानंतर आव्हाड यांनी शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांच्याशी संपर्क साधत याप्रकरणी तत्काळ संबंधितांची मदत करण्यास सांगितले. माहिती मिळताच दराडे, रवींद्र गामणे, रवींद्र चव्हाण यांनी पोलीस उपायुक्त विजय खरात यांना हा सगळा प्रकार सांगितला. यानंतर अवघ्या काही वेळेत खरात यांच्या आदेशान्वये इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी पोलिसांचा लवाजमा घेत हॉटेल गाठले. हॉटेलमध्ये प्रवेश करत माईनकर यांनी युवक-युवतींसोबत संवाद साधला आणि त्यांना दिलासा देत आपआपले सामान घेऊन बाहेर येण्यास सांगितले. त्यानंतर पोलीस वाहनात बसवून त्यांना रेेल्वेस्थानकापर्यंत पोहोचविले. दरम्यान, शहरातील नामांकित मोठ्या हॉटेलच्या व्यवस्थापनाकडून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक होत असल्याचे या घटनेवरुन समजते. याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे दराडे यांनी सांगितले.
---इन्फो--
‘आम्हाला आमच्या घरी जायचंय...’
आम्ही येथे हॉटेल मॅनेजमेंटचे ट्रेनिंग घेण्यासाठी आलो होतो, आमची आता सुटका झाली. आम्हाला आमच्या घरी सुखरूप जायचे आहे, आमची कोणाविरुध्दही तक्रार नाही’ असे पीडित प्रशिक्षणार्थ्यांनी पोलिसांना सांगितले. यामुळे पोलिसांनी कुठल्याही प्रकारची नोंद पोलीस ठाण्यात केली नाही किंवा हॉटेल मालक-चालकाविरुध्दही कारवाई केलेली नाही. पीडित अकरा युवक-युवतींपैकी कोणीही तक्रार न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे माईनकर यांनी स्पष्ट केले.
---
फोटो आर वर ०२इंदिरानगर नावाने सेव्ह आहे.