अकरावी प्र्रवेश शिल्लक; उपसंचालकांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 18:00 IST2018-08-21T17:59:36+5:302018-08-21T18:00:31+5:30

अकरावी प्र्रवेश शिल्लक; उपसंचालकांकडे मागणी
नाशिकरोड : बहुतांश ११ वीच्या विद्यार्थ्यांना घरापासून दूर असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याने त्यांची गैरसोय होत आहे. चार फेऱ्यांमध्ये १६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून अद्यापही ११ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहे. त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची व्यवस्था शिक्षण उपसंचालक विभागाकडून करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी संध्या भोर, अशोक बागुल यांना विभाग कृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांना आवडीच्या विषयासाठी संबधीत महाविद्यालयात प्रवेश हवा आहे त्या ठिकाणी प्रवेशच मिळालेला नाही. ११ वी विद्यार्थ्यांच्या प्रवेशामध्ये पारदर्शकता यावी यासाठी आॅनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र प्रत्यक्षात बहुतांश विद्यार्थी प्रवेशापासुन पासून वंचित आहे. पहिल्या चार फेºयांमध्ये १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याचे निश्चित झाले आहे. पण अद्यापही ११ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल का याबाबत पालकामध्ये चिंतेचे वातावरण आहे. नाव नोंदविल्यानंतर आता शाखा बदलण्याची संधी दिली असली तरीही अनेक विद्यार्थी ग्रामीण, आदिवासी भागातील असल्याने त्यांना शिक्षण विभागाकडून एसएमएस मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता कमी झाल्याने शिक्षण विभागाने त्वरीत प्रवेश देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नाशिक युवा कृती समितीचे संस्थापक दिपक वाघ, अतुल कोठावदे, अशोक साळवे, आशिष काळे, तौफिक खान आदिंच्या सह्या आहेत.