पोळवाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर इलेक्ट्रॉनिक गिझरला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:20 IST2018-08-22T00:19:59+5:302018-08-22T00:20:16+5:30
सराफ बाजारातील बालाजी कोट परिसरातील एका तीन मजली जुन्या वाड्यातील पोळवाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर अचानकपणे आग लागली. पाण्याच्या बादलीत सोडलेल्या हिटरकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाणी प्रचंड तापले आणि बादलीतून बाहेर पडले यावेळी हिटरही जमिनीवर पडल्याने घरातील काही कपड्यांसह पुस्तकांनी पेट घेतला. धूर निघत असल्याचे परिसरातील युवकांच्या तत्काळ लक्षात आल्याने अनर्थ टळला.

पोळवाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर इलेक्ट्रॉनिक गिझरला आग
नाशिक : सराफ बाजारातील बालाजी कोट परिसरातील एका तीन मजली जुन्या वाड्यातील पोळवाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर अचानकपणे आग लागली. पाण्याच्या बादलीत सोडलेल्या हिटरकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाणी प्रचंड तापले आणि बादलीतून बाहेर पडले यावेळी हिटरही जमिनीवर पडल्याने घरातील काही कपड्यांसह पुस्तकांनी पेट घेतला. धूर निघत असल्याचे परिसरातील युवकांच्या तत्काळ लक्षात आल्याने अनर्थ टळला. याबाबत अग्निशामक दलाकडून मिळालेली माहिती अशी, सराफ बाजारामागे सरस्वती चौकात असलेल्या पोळवाड्याच्या वरच्या मजल्यावरील खोलीमधून अचानकपणे मंगळवारी दुपारच्या सुमारास धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे परिसरातील रहिवाशांसह युवकांच्या लक्षात आले. घटनेची माहिती काही जागरूक नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला कळविली. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचेपर्यंत युवकांनी खोलीत धाव घेऊन सुखरूपपणे वयोवृद्ध नलिनी पोळ यांना खाली आणले आणि पाण्याच्या बादल्यांच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. अग्निशामक दलाचा बंब जुने नाशिकमार्गे भद्रकालीतून सराफ बाजारात पोहचला; मात्र सरस्वती चौकाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे दोन्ही बंब अडकले. आग लागलेल्या वाड्यापर्यंत बंब घेऊन जाणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर जवानांनी खाली उतरुन पाण्याचा होज ओढत वाड्याकडे नेला आणि पाण्याचा मारा सुरू केला. तापेर्यंत युवकांनी बादल्यांनी पाणी फेकून आग अधिक वाढू दिली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्रसंगावधान
जवानांनी घरात जाऊन गॅस सिलिंडर बाहेर काढला. सिलिंडरही पुर्णपणे काळा झाला होता. आग लवकर विझल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली नाही. लाकडी वाडा असल्यामुळे आणि अरुंद गल्लीबोळाचे आव्हान मदतकार्यापुढे होते; मात्र सुदैवाने आगीने रौद्रावतार धारण केला नाही, त्यामुळे मोठे संकट टळले.