सिडको भागात अनेक घरांवरून विद्युतवाहिनी
By Admin | Updated: April 30, 2017 02:02 IST2017-04-30T02:02:36+5:302017-04-30T02:02:46+5:30
नाशिक : सिडको परिसरात अनेक घरांवरून धोकादायक विद्युतवाहिनी गेल्या असून, त्यामुळे अनेकवेळा दुर्घटनादेखील घडल्या आहेत.

सिडको भागात अनेक घरांवरून विद्युतवाहिनी
नाशिक : सिडको परिसरात अनेक घरांवरून धोकादायक विद्युतवाहिनी गेल्या असून, त्यामुळे अनेकवेळा दुर्घटनादेखील घडल्या आहेत. या धोकादायक वाहिन्या तातडीने भूमिगत कराव्यात, अशी मागणी परिसरातील सामाजिक संघटना व ज्येष्ठ नागरिक संस्थांनी केली आहे.
सिडको परिसरात त्रिमूर्ती चौक ते उत्तमनगर हा नवीन वसाहतीचा भाग तसेच जुने सिडकोतील विजयनगर ते दत्त चौक आणि राणाप्रताप चौक यादरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सिडकोची जुने घरे पाडून त्यावर नवीन इमारती उभ्या केल्या आहेत, तर अनेक रहिवाशांनी दुमजली घरे तर काही ठिकाणी तीन ते चार मजली घरेदेखील उभारली आहेत. त्यातच इमारतीच्या गॅलरीलगत रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या जादा दाबाच्या विद्युतवाहिनी अद्यापही तशाच आहेत. काही ठिकाणी तर या विद्युतवाहिन्या घराच्या गच्चीलाच लागून आहेत तर काही भागात त्या लोखंडी जिने पायऱ्या आणि लोखंडी पत्र्यांना स्पर्श करून जातात. यामुळे अनेकवेळा पावसाळ्यात यामध्ये विद्युत प्रवाह उतरून शॉक लागण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे काही नागरिक मृत्युमुखीदेखील पडले आहेत. त्यामुळे सदर धोकादायक या विद्युतवाहिन्या तातडीने हटवून भूमिगत कराव्यात. या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त, सिडको विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले होते. परंतु अद्यापही कारवाई झालेली नाही. (प्रतिनिधी)