वीज कोसळून युवती ठार : भाजीपाल्यासह द्राक्ष, कांद्याचेही नुकसान
By Admin | Updated: March 29, 2015 00:20 IST2015-03-29T00:15:54+5:302015-03-29T00:20:44+5:30
जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा अवकाळी पाऊस

वीज कोसळून युवती ठार : भाजीपाल्यासह द्राक्ष, कांद्याचेही नुकसान
नाशिक : जिल्ह्यात इगतपुरीसह मालेगाव, ब्राह्मणगाव, देवळा, कळवण, पाळे खुर्द या भागात शनिवारी अवकाळी पाऊस झाला. कसारा घाटात दांड उमरावने येथील कविता अंकुश पुराने या युवतीचा विहिरीवर पाणी भरीत असताना वीज कोसळून मृत्यू झाला.
देवळा शहर व परिसरात अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, कांद्यांचे डोंगळे यांचे नुकसान झाले. दरमहा नियमितपणे पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
वणी व परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह अर्धातास पाऊस झाला. काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले.
पाळे खुर्द - कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरात आज बेमोसमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले असून, काढणीला आलेले कांदा गहू पावसाने संपूर्ण भिजला असून, वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. ह्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.
ब्राह्मणगाव - येथे शनिवारी रात्री सात वाजेनंतर वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा, मका या पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर्वीच्या तुलनेत अत्यंत कमी शिल्लक असलेल्यांपैकी बराचसा आंब्याचा मोहोरही गळाला. तसेच महिनाभरात दुसऱ्यांदा गाव परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. आधीच्या अवकाळी पावसाचे पीकपंचनामे पूर्ण होत नाही तोच पुन्हा नव्याने अवकाळी पाऊस आल्याने सरकारी बाबूंपुढे गाऱ्हाणी कशी व कितीवेळा मांडायची या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. (लोकमत ब्युरो)