शासकीय सेवेत नसताना केले निवडणुकीचे काम
By Admin | Updated: January 20, 2016 23:04 IST2016-01-20T22:57:30+5:302016-01-20T23:04:10+5:30
मालेगाव : ४० तरुणांची नेमणूक; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौैकशी

शासकीय सेवेत नसताना केले निवडणुकीचे काम
प्रवीण साळुंके मालेगाव
परिसरातील १२० तरुणांना सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस नोकरीच्या नियुक्त्या देत १८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार ५ जानेवारीला उघड झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याने अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. यातील सर्वात कहर म्हणजे यातील तब्बल ४० जणांची निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.
शहरातील न्यायालयासमोरील इमारतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेब मॅनेजमेंट नावाचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. या कार्यालयामार्फत १२० तरुणांना नोकरीवर नियुक्ती देण्यात येऊन त्यांना मे २०१५ पर्यंत पगार देण्यात आला होता. मात्र मेपासून पगार बंद झाल्याने या तरुणाची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर तरुण शासकीय नोकरीत नसताना ४० तरुणांनी दोन निवडणुकीच्या मतदानासाठी नियुक्त करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यात विधानसभा निवडणुकीचा समावेश आहे. या तरुणांना तत्कालीन तहसीलदारांच्या आदेशाने नियुक्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यात नांदगाव मतदारसंघात २४, मालेगावच्या दोन्ही मतदारसंघात १२ तर सटाणा मतदारसंघात ४ तरुणांनी निवडणुकीचे काम केलेले आहे. या तरुणांनी पुरावे सादर केल्याची माहिती मिळाली असून, यातील गांभीर्य वाढले आहे. या प्रकरणातील फिर्यादीने जिल्हाधिकाऱ्यांना या आदेशाच्या प्रती सादर केल्याचे समजते. त्या नियुक्तीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून, मंगळवारी तहसीलच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आल्याची माहिती आहे. यात या तरुणांनी आमच्या नेमणुका बोगस होत्या तर आम्हाला निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या कामात नियुक्तीचे आदेश कसे देण्यात आले होते, असा प्रश्न उपस्थित केला आहे.