येथील सिडको परिसरातील दत्तमंदिर स्टॉपजवळच्या देशी दारूच्या दुकानाबाहेर दोघा मद्यपींमध्ये शाब्दिक वाद होऊन हाणामारीची घटना मंगळवारी (दि.८) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. यावेळी एका वृद्ध मद्यपीचा दुसऱ्याने लाकडी दंडूक्याने बेदम मारहाण करत खुन केला. गणपत चंदर घारे (६५,रा.उंटवाडी) असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे.
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. २८ जून रोजी येथील स्वामीनगर भागात क्षुल्लक कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करत रात्री खुन करण्यात आला होता. या घटनेला दहा दिवस उलटत नाही, तोच पुन्हा मंगळवारी सिडकोतील दत्त मंदिर स्टॉपवर भर रस्त्यात देशी दारु दुकानाबाहेर खुनाची ही दुसरी घटना घडली. घारे व कोल हे दोघेही सोबत मद्यप्राशन करत असताना त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. कोल याने राग धरत मारहाण करण्यास सुरूवात केली. हाणामारीचा व्हिडिओ सोशलमिडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. अंबड पोलिसांनी संशयित आरोपी सरमोद कोल (३५ रा. त्रिमूर्ती चौक, मुळ मध्यप्रदेश) यास ताब्यात घेत अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक मधुकर कड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकिय जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. कोल याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बघ्यांनी भूमिका बदलली असती तर... मंगळवारी दुपारी त्रिमूर्ती चौक या भागात असलेल्या मद्याच्या दुकानासमोर दोघांमध्ये वाद सुरू असताना आजुबाजुला असलेले बघे हे निमूटपणे बघत होते. त्यांच्यापैकी काहींनी खिशातून मोबाइल काढून चित्रिकरणसुद्धा केले. हाणामारीचा व्हिडिओ सोशलमिडियावर व्हायरलही केला; मात्र जेव्हा हाणामारी होत होती, तेव्हा बघ्यांमधून कोणीही पुढे येऊन लाकडी दंडुक्याने मारहाण करणाऱ्यास रोखण्याचे धाडस दाखविले नाही, किंवा पोलिसांनाही कळविले नाही, अन्यथा ही खुनाची घटना टाळता आली असती, असे पोलिसांनी सांगितले.