खून प्रकरणी आठ संशयितांना अटक
By Admin | Updated: April 29, 2017 02:04 IST2017-04-29T02:04:39+5:302017-04-29T02:04:48+5:30
पंचवटी : सराईत गुन्हेगार अजित शशिकांत खिच्ची (२८) याची पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली़.

खून प्रकरणी आठ संशयितांना अटक
पंचवटी : दिंडोरीरोडवरील अवधूतवाडी (गजानन चौक) परिसरात गुरुवारी (दि. २७) सराईत गुन्हेगार अजित शशिकांत खिच्ची (२८) याची पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी आठ संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये पाच विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे.
गजानन प्रिंटर्ससमोर गुरुवारी रात्री संशयितांनी सराईत खिच्ची याच्यावर धारदार शस्त्राने वार केले़ खिच्ची याच्या अंगावर, पोटावर जखमा झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला़ या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी खिच्ची यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले़ मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़ या घटनेनंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
खिच्ची याच्यावर हल्ला करणारे संशयित पसार झाल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार आप्पा गवळी, मोतीराम चव्हाण, सतीश वसावे, सचिन म्हस्दे, जितू जाधव यांनी तपासचक्रे फिरवून संशयित आकाश प्रभाकर मोहिते (१९, रा़ अंबिकानगर), सागर पवार (१९, फुलेनगर), अक्षय राजेंद्र निकम (२१, गजानन चौक, अवधूतवाडी) यांच्यासह पाच विधिसंघर्षित बालकांसह आठ संशयितांना अटक केली़
संशयित व खिच्ची यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. या वादानंतर गुरुवारी भराडवाडीत पुन्हा खिच्ची व संशयित यांच्यात वाद झाले व त्यांनी खिच्चीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली़
याप्रकरणी मंगेश बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ तपास करीत आहेत.
दरम्यान, पंचवटी परिसरातील झोपडपट्टीमधील गुन्हेगारीने पुन्हा एकदा गंभीर घटनांचा कळस गाठल्याने परिसरातील नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. मागील काही महिन्यांपासून पंचवटीत सराईत गुन्हेगारांच्या झालेल्या हत्यांमुळे टोळ्यांमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याचे दिसून येते. याचे गंभीर परिणाम आगामी काळात होऊ शकतात अशी भीती परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार खुलेआम परिसरात फिरत असतानाही पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)