आठ जणांचे सदस्यत्व रद्द
By Admin | Updated: August 29, 2015 00:14 IST2015-08-29T00:14:06+5:302015-08-29T00:14:20+5:30
कारवाई : निवडणूक खर्च सादर करण्यास टाळाटाळ

आठ जणांचे सदस्यत्व रद्द
अभोणा : कळवण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या खर्चाचा तपशील सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आठ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून, १० उमेदवारांना पुढील पाच वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी हा आदेश दिला आहे.
तालुक्यात २२ एप्रिल रोजी २५ ग्रामपंचायतींच्या २६१ जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. यातील बिनविरोध निवड झालेल्या १२९ उमेदवारांनी तसेच निवडणूक लढविलेल्या ४०० उमेदवांनी तहसीलदार कार्यालयात ठरवून दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्च सादर करणे गरजेचे होते.
मात्र निवडणूक निकालानंतर २९० उमेदवारांनीच निवडणूक खर्च सादर केल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर ११० सदस्यांना २४ एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालयाने निवडणूक खर्च करण्यासाठी नोटीस बजावली
होती. याची दखल घेत ९२ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला. मात्र उर्वरित १८ उमेदवारांनी खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे तहसील विभागाने यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता.
त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आठ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले असून, १० उमेदवारांना पाच वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची कारावाई केली आहे. खर्डे दिगरचे तीन, पुनदनगरचे दोन, तर शिवभांडणे, धार्डेदिगर व गोळाखालचा येथील प्रत्येकी एक सदस्याचा समावेश आहे तर बंदी घातलेल्या १० उमेदवारांमध्ये खर्डे दिगरचे चार, दळवट व पुनदनगर येथील प्रत्येकी दोन व शिवभांडणे व भांडणे (हा.) येथील प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश आहे. (वार्ताहर)