तडीपार गुंडांकडून आठ घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:54+5:302021-02-05T05:38:54+5:30
शहरातील मुंबई नाका, भद्रकाली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होणाऱ्या घरफोड्यांच्या घटना रोखण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याकरिता सहायक पोलीस आयुक्त ...

तडीपार गुंडांकडून आठ घरफोड्या
शहरातील मुंबई नाका, भद्रकाली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होणाऱ्या घरफोड्यांच्या घटना रोखण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याकरिता सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पथकाला तपास करून संशयितांच्या मुसक्या बांधण्याचे आदेश दिले होते. यानुसार सहायक पोलीस निरीक्षक के. टी. रौंदळे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित तडीपार गुंड बब्बू पप्पू अन्सारी ऊर्फ सोहेल, वसीम अब्दुल रहेमान शेख यांना शिताफीने अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचा दुसरा साथीदार संशयित दीपक पितांबर गायकवाड यासही पोलिसांनी अटक केली. या तीनही संशयितांना पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्यांनी मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीतील सहा व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील दोन अशा एकूण आठ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या चोरट्यांकडून घरफोड्यांमध्ये लांबविलेले १८ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची नथ, चांदीचे ताट, फुलपात्रे, चार लॅपटॉप, मिनी गॅस सिलिंडर, शेगडी, आयफोन, मिक्सर, स्टीलची पंचपात्री, जर्मनचे डब्बे असा सुमारे ४ लाख ५५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.