Eid-e-Milad procession | ईद-ए-मिलादनिमित्त मिरवणूक

इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जुने नाशिक परिसरातून काढण्यात आलेली मिरवणूक.

ठळक मुद्देसामूहिक ‘दुवा’ : हमारे हिंदोस्ता को तरक्की अता फरमा...

नाशिक : ‘हमारे मुल्क-ए-हिंदोस्ता को तरक्की अता फरमा..., मुल्क हिंदोस्ता में अम्नो-अमान, भाईचारा कायम फरमा..., मुल्क के दुश्मनो के मनसुबे को नेस्तनाबूत फरमा..., अशी प्रार्थना करत शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंतीची मुख्य मिरवणूक (जुलूस) जुन्या नाशकातून रविवारी (दि.१०) काढण्यात आली. पारंपरिक पोशाखात मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.
इस्लाम धर्माचे प्रेषित व मानवतेचे पुरस्कर्ते हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती शहर व परिसरासह जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमांनी शांततेत साजरी करण्यात आली. यानिमित्ताने करण्यात आलेल्या आकर्षक सजावटीने मुस्लीमबहुल भागाचे रूपडे पालटले होते. नाशिकरोड, वडाळागावातूूनही सकाळी मिरवणुका काढण्यात आल्या. तसेच शहराची मुख्य मिरवणूक दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास जुन्या नाशकातील चौक मंडई येथून खतीब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. प्रारंभी त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी उपस्थितांनी ‘आमीन’ म्हणत दुजोरा दिला. बडी दर्गाचे विश्वस्त हाजी वसीम पिरजादा, रझा अकादमीचे एजाज रजा मकरानी, शरियत समितीचे सलीम पटेल, बालम पटेल, गुलजार कोकणी आदी उपस्थित होते. सजविलेल्या बग्गीमध्ये अग्रभागी खतीब यांच्यासह शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी होते. बग्गीच्या पाठीमागे जीपमध्ये विवध धर्मगुरूंना स्थान देण्यात आले होते. मिरवणूक मार्गावर दुतर्फा हिरवे, पांढरे ध्वज, स्वागतकमानी, विद्युत माळा लावून सजावट करण्यात आली होती. मिरवणुकीत सहभागी नागरिकांना ठिकठिकाणी विविध परिसरांमध्ये ओली खजूर, बिस्कीट, नानकटाई आदी खाद्यपदार्थांसह पाणीवाटप केले जात होते. दुतर्फा परिसरातील नागरिकांनी मिरवणूक बघण्यासाठी गर्दी केली होती.
‘सारे जहां से अच्छा...’चा घुमला नारा
मिरवणुकीच्या प्रारंभी नारे तकबीर अल्लाहु अकबर..., नारे रिसालत या रसूलअल्लाह..., जश्ने ईद-ए-मिलादुननबी जिंदाबाद..., या घोषणांसह सारे जहां से अच्छा, हिंदोस्ता हमारा असा नारादेखील समाजबांधवांकडून बुलंद करण्यात आला. तसेच सिडकोच्या स्टेट बॅँक चौक मित्रमंडळाने त्यांच्या वाहनाच्या अग्रभागी उंच असा तिरंगा ध्वज लावून मिरवणुकीत सहभाग घेत राष्टÑप्रेमाचे दर्शन घडविले. या मंडळाचे तिरंगा ध्वज लावलेले वाहन लक्षवेधी ठरले. या वाहनासोबत अनेकांनी ‘सेल्फ ी’देखील घेतले.

Web Title: Eid-e-Milad procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.