The effect of corona on MPSC examination | एमपीएससी परीक्षेवर कोरोनाचा प्रभाव

एमपीएससी परीक्षेवर कोरोनाचा प्रभाव

ठळक मुद्दे२ हजार उमेदवारांची परीक्षेला दांडी १३ हजार ७३५ उमेदवारांची उपस्थिती

नाशिक : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक (एएमव्हीआय) पदासाठी रविवारी (दि.१५) शहरातील ४१ परीक्षा केंद्रांवर पूर्वपरीक्षा घेण्यात आली. संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस अर्थात कोव्हीड १९ विषाणूच्या सावटाखालीच शहरात ही एमपीएससीची परीक्षा पार पडल्याचे दिसून आले. नाशिकमध्ये १५ हजार ८४२ उमेदवारांपैकी १३ हजार ७३५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली.
कोरोनाच्या सावटाखाली झालेल्या या परीक्षेला कोरोनाच्या भीतीसोबतच विविध कारणांनी तब्बल दोन हजार १०७ उमेदवारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. या परीक्षेसाठी राज्यातून साधारण ९५ हजार परीक्षार्थी बसले होते. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. या परीक्षेसाठी परीक्षार्थी सकाळी दीड तास आधी प्रवेशपत्र, ओळखपत्र व त्याच्या छायांकित प्रतीसह केंद्रावर हजर होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्गखोल्यांमध्ये परीक्षार्थींमध्ये अंतर ठेवण्यात आले होते.
गैरप्रकारमुक्त परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नाशिक शहरातील ४१ केंद्र्रांवर ही परीक्षा घेतली. त्यासाठी १ हजार २५० कर्मचारी कार्यरत करण्यात आले होते. कोणत्याही केंद्र्रावर कॉपी वा अन्य गैरप्रकार आढळून आला नाही. विशेष म्हणजे सर्वच परीक्षा केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: The effect of corona on MPSC examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.