शिक्षणाची होती ‘तिला’ आस; लपवलेल्या चिठ्ठीने लागला तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:17 IST2021-08-28T04:17:54+5:302021-08-28T04:17:54+5:30
नांदगाव : अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार पोलिसांत देणाऱ्या आई-वडिलांनी खरे कारण लपवून ठेवल्याने, पोलिसांची मात्र विनाकारण दमछाक ...

शिक्षणाची होती ‘तिला’ आस; लपवलेल्या चिठ्ठीने लागला तपास
नांदगाव : अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार पोलिसांत देणाऱ्या आई-वडिलांनी खरे कारण लपवून ठेवल्याने, पोलिसांची मात्र विनाकारण दमछाक होऊन, निरपराध व्यक्तींना त्रासाला सामोरे जावे लागल्याची घटना घडली आहे. मुलीला शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांना एका घरात लपून बसलेल्या मुलीला पकडण्यासाठी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करावा लागल्याची वार्ता संपूर्ण शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरून अनेक तर्कवितर्कांना उधाण आले.
काही दिवसांपूर्वी मुलगी निघून गेल्याची तक्रार परधाडी येथून पोलिसांत दाखल झाली होती. मुलगी १७ वर्षे व ९ महिन्यांची असल्याने पोलीस तत्काळ कामाला लागले. माहितीचे धागे हाती लागत असताना मुलीचा प्रवास परधाडी... बोलठाण... शिवूर (औरंगाबाद) नाशिक व अहमदनगरपर्यंत झाला. दरम्यान, पोलिसांवर मुलगी शोधण्यासाठी दडपण येत होते. वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या. मात्र सत्य स्थिती कळाली तेव्हा वेगळाच प्रकार समोर आला. मुलगी घरातून निघून जाण्यामागे तिच्या आई-वडिलांनी पुढचे १२वीचे शिक्षण घेण्यासाठी केलेली सक्त मनाई हे कारण असल्याचे समोर आले. तिने घर सोडून जाताना चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी कुटुंबीयांनी पोलिसांपासून लपवून ठेवली होती. पण, ती चिठ्ठी व्हॉट्सॲपमधून पोलिसांपर्यंत पोहोचली. तोपर्यंत पोलिसांचा तपास वेगळ्या दिशेने सुरू होता. चिठ्ठीमुळे घरच्यांचे पितळ उघडे पडले. घरातून पुढचे शिक्षण घेण्यासाठी विरोध असल्याने ती निघून गेल्याचे स्पष्ट झाले.
इन्फो
शिक्षकाने दिला होता आश्रय
कोरोनामुळे एक वर्ष घरी राहिल्यानंतर शाळेत जाण्याची मानसिकता कमी झाल्याची उदाहरणे एकीकडे समोर येत असताना पुढच्या शिक्षणाची जिद्द व त्यासाठी घर सोडून जाण्याची तयारी हे आगळे उदाहरण आहे. ज्या गृहस्थाश्रमी शिक्षकाने तिला आश्रय दिला होता. त्यांच्यावर शिंतोडे उडविण्यात आले. मात्र गुरू-शिष्याच्या नात्याला त्यांनी अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले. तिची शिक्षणाची दृढ इच्छा बघून शिक्षक पती-पत्नीने तिच्या शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दर्शविली होती. गुरुवारी पंचायत राज कमिटी येणार म्हणून शिक्षकाला शाळेवर जावे लागणार होते. घरी जाण्यापेक्षा आत्महत्या करीन, अशी धमकी देणाऱ्या तिला, तिच्या इच्छेनुसार घरात बसवून कुलूप लावून व किल्ली तिच्याकडे देऊन शाळेत शिक्षक गेले. त्यांनी पोलिसांना सविस्तर कल्पना दिली. पोलीस त्यांच्या घरी गेले आणि कुलूप तोडून तिला आठ-दहा तास खूप समजावल्यानंतर आई-वडिलांच्या ताब्यात दिले.