शिक्षण खाते वर्षभर पिछाडीवर !
By Admin | Updated: March 8, 2016 00:22 IST2016-03-07T23:20:50+5:302016-03-08T00:22:01+5:30
संच मान्यतेचा प्रश्न : गेल्या वर्षीची कार्यवाही यंदा

शिक्षण खाते वर्षभर पिछाडीवर !
नाशिक : गेल्या २०१२-१३ नंतर अद्याप शिक्षण खात्याने संच मान्यता केलेली नाही. मात्र आता ही संच मान्यता सुरू केली असली तरी गेल्या वर्षाची संच मान्यता आता करण्यात येत असून, शैक्षणिक वर्ष संपत असताना सुरू होत असलेल्या या कार्यवाहीने शिक्षण खाते किती मागे आहे, हेच स्पष्ट होत आहे.
शिक्षण खात्याने पटसंख्येच्या आधारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या आधारे आकृतिबंध मंजुरीचे धोरण आखल्याने जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा जिव्हाळ्याचा विषय आहे. २०१२-१३ मध्ये पटपडताळणी करण्यात आल्याने त्यावेळी शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले.
अनेक कर्मचारी तर पूणवेळचे अर्धवेळ केल्याने त्यांच्या वेतनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. खरे तर दरवर्षी संच मान्यता करण्याची गरज असताना केवळ वेळकाढूपणा करीत शिक्षण खात्याच्या वतीने जबाबदारी ढकलली गेली. आता शिक्षण खात्याने गेल्या वर्षीची संच मान्यता फेब्रुवारी, मार्च महिन्यात सुरू केली आहे. शैक्षणिक वर्ष संपण्यात अवघे दीड ते दोन महिने राहिले असताना आता शिक्षण मंडळाला जाग आली आहे. (प्रतिनिधी)