मालेगावः बनावट दाखले प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) प्रवेश झाला असून त्यांनी शुक्रवारी शहरात छापे टाकून तपासणी सुरू केली आहे. ईडीच्या पथकाने अनेक ठिकाणी छापे टाकल्याचे बोलले जात आहे. शहरात बनावट जन्मदाखल्यांद्वारे बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येत असल्याचा प्रकार डिसेंबर २०२४ ला उघडकीस आला होता. या प्रकरणी छावणी पोलिसात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून विशेष तपासी पथकाद्वारे याची तपासणी करण्यात येत आहे.
दुसरीकडे शासनाने सुमारे ४ हजार उशिराचे जन्मदाखले रद्द केले आहे. यात शुक्रवारी ईडीचा प्रवेश झाला असून त्यांचे एक पथक एम एच ०१-सीटी ९१९२ या गाडीने शुक्रवारी सकाळी दाखल झाले. त्यांनी सकाळी दहा वाजेपासून आपल्या कारवाईस सुरुवात केली आहे. त्यात ईडीच्या एका पथकाने रौनकाबादमधील गल्ली नंबर ७ येथील या गुन्ह्यातील संशयित व महानगरपालिकेचे दुय्यम निबंधक अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक यांच्या निवासस्थानी छापा टाकला. सदर पथकात तीन पुरुष व एक महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी तवाब यांच्या घरात जाऊन तपासणी सुरुवात केली. सायंकाळी चार वाजेपर्यंत हे पथक त्याच्या घरात ठाण मांडून बसलेले होते. यावेळी घराबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. या तपासणी काळात कोणालाही घरात जाण्यास किंवा घरातन बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलेला होता. ईडीच्या पथकाने येतांनाच बंदोबस्तासाठी राखीव दलाचे अधिकारी व कर्मचारी आणले होते. त्यांनी या छाप्यापासून स्थानिक पोलिसांना दूर ठेवत त्यांना कोणतीही कल्पना दिली नाही.
पंचनामा करून पथक मुंबईकडे रवानामालेगाव शहरातील रौनकाबाद येथील तवाब यांच्या घरात ईडीच्या पथकाने सकाळपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत तपासणी केल्यानंतर पथक मुंबईकडे रवाना झाले. कारवाईविषयी पथकाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देणे टाळले. पथकाला तवाब यांच्या घरात काही जन्म, मृत्यू दाखले तसेच यासाठी लागणारी कागदपत्र मिळाल्याचे कळते. पंचनामा करून ही कागदपत्र पथकाने ताब्यात घेतली असून, पंचनाम्याची एक प्रत तवाब यांच्या कुटुंबीयांना दिल्याची माहिती माजी आमदार आसिफ शेख यांनी दिली. इतर ठिकाणी केलेल्या कारवाईविषयी अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत मिळालेली नव्हती.