दत्त दत्त ऐसे लागले ध्यान..
By Admin | Updated: December 25, 2015 00:31 IST2015-12-25T00:29:23+5:302015-12-25T00:31:41+5:30
.दत्तजयंती : शहरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा; पालखीची मिरवणूक

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान..
नाशिक : ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात शहरातील विविध दत्त मंदिरांत जयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शहरातील
दत्त मंदिरांत सकाळपासून
रांगा लागल्या होत्या. अर्थात, सायंकाळी पौर्णिमा सुरू झाली आणि ती शुक्रवारी दुपारी संपणार असल्याने काही दत्त मंदिरांत विशेषत: श्री स्वामी समर्थ केंद्रांमध्ये उद्या (दि.२५) दत्तजयंती साजरी होणार आहे.
दत्तजयंतीनिमित्त शहराच्या विविध भागात धार्मिक कार्यक्रम सुरू होते. विशेषत: घरोघर आणि अनेक मंदिरांत गुरुचरित्राची पारायणे सुरू होती.
शहरातील श्रद्धास्थान असलेल्या एकमुखी दत्त मंदिरात सायंकाळी साडेसहा वाजता दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि शेकडो भाविकांनी दिगंबरा दिगंबराचा जयघोष सुरू केला. या मंदिरात सकाळपासून लघुरुद्र, वस्त्रार्पण करण्यात आले. दुपारी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.
११०० किलो मोहनथाळ प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला. सायंकाळी पारंपरिक उत्साहात दत्तजयंती साजरी करण्यात आल्यानंतर महाआरती करण्यात आली. रात्री अकरा वाजता दत्ताची पालखी काढण्यात आली. कृषीनगर, गंगापूररोड, गोल्फ क्लब, कालिका मंदिराजवळील औदुंबर देवस्थान, नाशिकरोड आणि सिडको या भागातदेखील दत्तनामाच्या जयघोषात जयंती उत्सव, महाआरती आणि महाप्रसादाचे कार्यक्रम संपन्न झाले.