वनखात्याच्या आडमुठेपणामुळे संपूर्ण गाव अंधारात
By Admin | Updated: August 13, 2015 00:01 IST2015-08-12T23:58:20+5:302015-08-13T00:01:09+5:30
वर्षभरापासून सामग्री पडून : ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत

वनखात्याच्या आडमुठेपणामुळे संपूर्ण गाव अंधारात
नाशिक : ग्रुप ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या पाड्यात शासनाच्या इतर सोयी-सुविधा पुरविल्या जात असतानाच निव्वळ वन खात्याच्या आडमुठेपणामुळे सुरगाणा तालुक्यातील ठाणापाडा (हातगड) हे सुमारे तीनशे लोकवस्तीचे गाव गेल्या पन्नास वर्षांपासून अंधारात आहे. वाडी-वस्ती विद्युतीकरणाचा भाग म्हणून या गावात विजेसाठी सर्व सामग्री येऊन पडलेली असताना वनखात्याच्या हद्दीत विजेचे खांब उभे करण्यास मज्जाव केला जात असल्याने गावाला अंधारात चाचपडावे लागत आहे.
विशेष म्हणजे ठाणापाडा ग्रामस्थांनी वन हक्क कायद्यान्वये सामूहिक दावाही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करून त्याबाबतची सारी पूर्तता करून दिली आहे. परंतु अशा प्रकारचा दावा करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने येत्या काही दिवसात संपूर्ण गावानेच उपोषण, आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. हातगड ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या ठाणापाडा येथे ६४ उंबरे असून, साधारणत: तीनशे कुटुंबे राहतात. परंतु आजवर या पाड्यात वीज पोहोचू शकलेली नाही, त्यामुळे अंधारातच वाटचाल करणाऱ्या या पाड्यातील ग्रामस्थांनी शासन दरबारी पाठपुरावा करून वीज मंजूर करून घेतली खरी, मात्र गावात विजेचे पोल टाकण्यासाठी वन खात्याच्या जमिनीचा वापर करावा लागतो व वन खाते त्यास नकार देत आहे. पाड्याच्या हद्दीपर्यंत विजेचे रोहीत्र तसेच लोखंडी पोल व तारा वर्षभरापासून येऊन पडल्या आहेत तसेच हद्दीपर्यंत वीज जोडणीही पूर्ण झालेली आहे. परंतु वन खात्याच्या हद्दीत पोल उभारता येणार नाही अशी भूमिका घेण्यात आल्याने संपूर्ण गावालाच अंधार कोठडीत राहावे लागत आहे. पाड्याच्या वापरासाठी वन हक्क कायद्यान्वये जागा मिळावी अशी विनंती व प्रस्ताव ग्रामस्थांनी सादर केलेला असतानाही त्यालाही मंजुरी मिळत नाही. पाड्यावर वीज नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, एकतर वन खात्याने सामूहिक दावा मान्य करावा किंवा वीज पोल टाकण्याची अनुमती द्यावी अशी मागणी जिवला गवळी, नारायण गावीत, रामचंद्र पिठे, साहेबराव पवार, आदि ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे.