प्रस्तावित कायद्याच्या विरोधात धरणे
By Admin | Updated: February 12, 2015 00:48 IST2015-02-12T00:36:49+5:302015-02-12T00:48:53+5:30
प्रस्तावित कायद्याच्या विरोधात धरणे

प्रस्तावित कायद्याच्या विरोधात धरणे
नाशिक : केंद्र सरकारच्या प्रस्तावित नवीन वाहतूक कायद्यातून एस.टी. महामंडळास जाचक ठरू पाहणाऱ्या तरतुदी वगळण्यात याव्यात, या मागणीसाठी बुधवारी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
इंटकचे राज्य अध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, केंद्र सरकार रस्ते वाहतूक व सुरक्षित कायदा आणू पाहात असून, त्यात एस. टी. महामंडळास जाचक अशा अटी व शर्ती आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या प्रचलित मोटार वाहन कायदा १९८८ कलम ९९ ते १०४ नवीन विधेयकामध्ये वगळण्यात आले आहे. त्यामुळे एस. टी. सारख्या सार्वजनिक संस्थांना देण्यात आलेली प्रवासी वाहतुकीची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते, त्याचबरोबर गाव पातळीवर प्रवासी वाहतुकीची व्यवस्था निर्माण होऊन खासगी कंपन्या उभ्या राहतील.
ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असेल त्या मार्गाचा ठेका खासगी कंपन्या घेतील व ज्या मार्गावर प्रवासी नाहीत, तेथे एस.टी. ला प्रवासी वाहतूक करावी लागेल. परिणामी एस.टी. महामंडळ तोट्यात येईल व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवन देशोधडीला लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्तावित कायद्यातून जाचक असलेल्या अटी व शर्ती वगळण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या आंदोलनात योगिता अहेर, समिना मेमन, आकाश छाजेड, परवेज मेमन, सुनील आव्हाड, गोरख खोकले, अशोक जाधव, विजय गायकवाड, रमेश इप्पर, दिलीप सूर्यवंशी आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)