पंचवटीतील पडक्या वाड्यांमुळे पावसाळ्यात धोका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:36 IST2018-05-20T00:36:44+5:302018-05-20T00:36:44+5:30
‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पंचवटी महापालिकेच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी विभागातील पडके वाडे, धोकादायक इमारतींबाबत भाडेकरू तसेच मालकांना लेखी नोटिसा बजावून आपली कागदोपत्री जबाबदारी पार पाडत आहे.

पंचवटीतील पडक्या वाड्यांमुळे पावसाळ्यात धोका कायम
पंचवटी : ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पंचवटी महापालिकेच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी विभागातील पडके वाडे, धोकादायक इमारतींबाबत भाडेकरू तसेच मालकांना लेखी नोटिसा बजावून आपली कागदोपत्री जबाबदारी पार पाडत आहे. मात्र संबंधित घरमालक व भाडेकरू पडक्या वाड्यांची तसेच घरांची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करीत नसल्याने धोकादायक घरांचा व पडक्या वाड्यांचा पावसाळ्यात धोका कायम असल्याचे मनपा प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. पंचवटी परिसर गावठाण असल्याने परिसरात अनेक जुने वाडे व इमारती आहेत. भाडेकरू जुने असल्याने घरमालक व भाडेकरू यांच्यात वर्षानुवर्ष वाद सुरू आहेत. अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. पावसाळ्यात पंचवटीत दरवर्षी जुन्या वाड्यांचा भाग कोसळण्याच्या घटना घडतात. घरमालक व भाडेकरू वादात पडक्या वाड्यांची तसेच घरांची दैनीय अवस्था झाली असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे पालिका प्रशासन केवळ नोटीस बजावण्याचे महत्त्वाचे काम करते, परंतु पडक्या वाड्यांची तसेच घरांची दुरुस्ती केली किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नसल्याचे दिसून येते. पंचवटीतील राममंदिर परिसर, मालवीय चौक, गंगाघाट परिसर या ठिकाणच्या भागात अनेक जुने वाडे व मोडकळीस आलेल्या इमारती असून, पावसाळ्यात या इमारतींना कायम धोका असतो. मनपा प्रशासन यंदाही पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधितांना नोटीस बजावण्याचे काम करणार मात्र नोटीस दिल्यानंतर संबंधित घरमालक किंवा भाडेकरू त्या पडक्या घरांची डागडुजी करणार की धोकादायक भाग उतरवून घेणार याची पाहणी प्रशासन करणार की नाही हे पावसाळ्यातच दिसून येईल. पावसाळा सुरू होण्याअगोदर मनपा प्रशासनाच्या वतीने संबंधित घरमालक तसेच भाडेकरूंना धोकादायक वाड्यांचा जीर्ण भाग उतरवून घेण्यास तसेच दुरुस्ती करण्यासाठी नोटिसा बजावतात, मात्र पावसाळा संपल्यानंतरही या पडक्या वाड्यांची, धोकादायक इमारतींची व घरांची परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे बघायला मिळते.