योग्य भाव मिळत नसल्याने शेतक-यांनी टोमॅटो फेकले
By Admin | Updated: January 3, 2017 16:30 IST2017-01-03T16:30:58+5:302017-01-03T16:30:58+5:30
घोटी बाजार समितीत टोमॅटोला केवळ 50 पैसे किलो इतका कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
योग्य भाव मिळत नसल्याने शेतक-यांनी टोमॅटो फेकले
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 3 - घोटी बाजार समितीत टोमॅटोला केवळ 50 पैसे किलो इतका कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बाजार समितीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून अपेक्षित भाव मिळत नसल्याने विक्रीसाठी आणलेल्या मालाला ग्राहक मिळत नसल्याने हे टोमॅटो बाजार समितीतच फेकून देण्याचे प्रकार घडत आहे.
इगतपुरी तालुक्यात असणा-या धरणामुळे मोठ्या प्रमाणात बागायती पिके घेण्याकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. यावर्षीही तालुक्यातील शेतक-यांनी विविध ठिकाणाहून कर्ज काढून महागडी बियाणे, औषधे खते, घेऊन टोमॅटोची लागवड केली होती. या महिन्यात मोठया प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी तयार झाले असल्याने, घोटी बाजार समितीत विक्रीसाठी आणले जातात. मात्र या टोमॅटोला अल्प भाव मिळत असल्याने, तसेच काही टोमॅटोला ग्राहकच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव शेतीमाल फेकून द्यावा लागत आहे.
दरम्यान टमाटे लागवडी पासून ते विक्रीपर्यंत एका जाळीला शंभर रूपयाहुन अधिक खर्च येत असून त्या तुलनेत टोमॅटोच्या एका जाळीला अवघा दहा ते वीस रुपयांचा भाव मिळत असल्याने तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हे विक्री न केलेले टोमॅटे शेतकरी बाजार समिती आवारात फेकून देत असल्याने ते जनावराचे खाद्य ठरत आहे.
बाजार समिती आवारात घाणीचे साम्राज्य
दरम्यान घोटी बाजार समितीत स्वच्छता कामगाराच्या अभावामुळे बाजार समिती आवारात मोठ्या प्रमाणात कच-याचे ,घाणीचे आणि फेकून दिलेल्या टोमॅटोचे ढीग साचत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.