सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने घाणीचे साम्राज्य
By Admin | Updated: November 24, 2014 23:51 IST2014-11-24T23:51:40+5:302014-11-24T23:51:49+5:30
नांदूरशिंगोटे : स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी; आजारांत वाढ

सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने घाणीचे साम्राज्य
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातल्या नांदूरशिंगोटे येथे सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने गावात घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून गावात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्के यांनी केली आहे.
सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या नांदूरशिंगोटेतील समस्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तालुकाभरात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले जात असतांना नांदूरशिंगोटे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा आरोप बर्के यांनी केला आहे. ग्रामपंचायतीकडे तीन सफाई कामगार असूनही जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या गटारींमुळे दुर्गंधी पसरली आहे. हजारो रुपये ग्राम स्वच्छतेवर खर्च करुनही गावात घाणीचे साम्राज्य असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
निमोण नाका, बसस्थानक, अचानक चौक, रेणुका माता मंदिराजवळील तलाव, मातंग वस्ती, विकास सोसायटीच्या पाठीमागचा भाग, अंगणवाडी आदि भागातील गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. प्लॅस्टिक पिशव्या, कचरा यामुळे गटारींतून पाण्याचा निचरा होत नाही. दर आठवड्याला गटारींची सफाई होत नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप बर्के यांनी केला आहे. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या कचऱ्याने भरल्या आहेत.
निमोणनाका परिसरातील साई अॅटोमोबाईल्स दुकानासमोर गटारी तुंबल्याने याठिकाणी दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे. शिर्डी, कोपरगाव, लोणी, निमोण, वावी आदि भागात जाण्यासाठी प्रवाशांना याच ठिकाणी थांबावे लागते. मात्र, गटारी तुंबल्याने रस्ता ओलांडणेही अवघड बनले आहे.
गावातील सर्वच गटारींतील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेऊन तुंबलेल्या गटारी प्रवाहीत कराव्यात. गटारींवर प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करावी. आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी बर्के यांच्यासह दत्ता सानप, बाळासाहेब वाक्चौरे, रामदास सानप, विकास संस्थेचे अध्यक्ष कैलास बर्के, संदीप शेळके, संजय शेळके, नागेश शेळके, मनोज उगले, भारत दराडे, बाळासाहेब कांगणे आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)