पाणी नसल्याने शेतकरी होणार उद््ध्वस्त

By Admin | Updated: November 11, 2015 00:06 IST2015-11-11T00:06:34+5:302015-11-11T00:06:59+5:30

जलचिंतनचा दावा : रब्बीला आवर्तनच नाही मिळणार

Due to lack of water, farmers will be ready | पाणी नसल्याने शेतकरी होणार उद््ध्वस्त

पाणी नसल्याने शेतकरी होणार उद््ध्वस्त

नाशिक : खरिपाच्या एकूण आवर्तनापेक्षा जास्तीचे पाणी सिंहस्थ शाहीस्नानामुळे गंगापूर धरणातून वापरण्यात आले. त्यातच आता जायकवाडी धरणात पाणी सोडल्याने आगामी काळात गंगापूर धरणातून शेतीसाठी पाणीच मिळणार नसल्याने जिल्ह्यातील शेकडो एकर शेती उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केला आहे.
जलचिंतन संस्थेमार्फतच जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका फेटाळल्यानंतर नुकतेच गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी व दारणा धरणातून ३.२४ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणातील अधिकाऱ्यांविरोधात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आरोप केले होते.
जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी सांगितले की, दारणा धरणातून तरी यापुढे शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुटणार आहे. मात्र गंगापूर धरणातून शेतीसाठी एक थेंबही आता आवर्तन सुटणार नसल्याने या परिसरातील शेती उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
गंगापूर धरण समूहात १७०.८० दलघमी पाण्याचा उपयुक्त साठा असून, त्यापैकी या खरिपात ५४.५८ दलघमी पाणी वापरण्यात आले. तसेच २२५.३८ पाणीसाठा १५ आॅक्टोबर २०१५ पर्यंत उपलब्ध होता. त्यापैकी ३८.३८ दलघमी म्हणजेच १.३६ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले, तर दारणा धरण समूहात ३८६.८८ दलघमी पाणीसाठा उपयुक्त होता. त्यापैकी १६५.९९ पाणी खरिपासाठी वापरले गेले. दारणा धरण समूहात ५५२.८७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. दारणा समूहातून ९१.८७ दलघमी अर्थात ३.२४ टीएमसी पाणी सोडावयाचे आहे. त्यामुळे दारणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन मिळू शकते.
मात्र गंगापूर समूहातून शेतीसाठी आवर्तन मिळणे मुश्कील आहे. गंगापूर धरण समूहातून ६०० दलघफू (१७.२ दलघमी) पाणी खरिपासाठी अनुज्ञेय होते. मात्र सिंहस्थ शाहीस्नान व वाढलेल्या लोकसंख्येमुळे मनपाकडून ५४.५८ दलघमी (१.९२ टीएमसी) पाण्याचा वापर चार महिन्यांत झाला आहे. त्यामुळे रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन मिळणे अवघड आहे. आता महापालिकेच्या पाण्यात कपात करून शेतीला पाणी देणे आवश्यक आहे. नाही तर शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचे राजेंद्र जाधव यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to lack of water, farmers will be ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.