येवला : शहरातील बस स्थानकाचे नूतनीकरणासह अद्यावतीकरणाचे काम सुरू असून, सदर कामे अंतिम टप्प्यात आहेत. बस स्थानकावर महामंडळाचे सुरक्षारक्षक वा पोलीस नसल्याने प्रवासी वर्गासह स्थानकाची सुरक्षा रामभरोसेच आहे. बस स्थानकाच्या दुरवस्थेबाबत सातत्याने तक्रारी झाल्याने, परिवहन महामंडळानेच बस स्थानकाच्या नूतनीकरणासह अद्यावतीकरणाचे काम हाती घेतले आहे. ठेकेदाराच्या माध्यमातून बस स्थानक आवाराचे सिमेंट काँक्रिटीकरण, प्रवेशद्वार, फरशीकरण, खुल्या जागेत पेवर ब्लॉक बसविणे, सौरऊर्जेवर पथदीप व विद्युतीकरण आदी सुमारे दीड कोटी रुपये खर्चाची कामे हाती घेण्यात आली आहेत. गेल्या चार महिन्यांपासून सदर कामे सुरू असून, यापैकी काही कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. बस स्थानकातील सहा प्लॅटफार्मच्या नूतनीकरणासह नव्याने तीन प्लॅटफार्म करण्यात आले आहे. येवला आगाराला एका महामंडळाचा व इतर तीन असे चार सुरक्षा कर्मचारी आहेत. मात्र, बस स्थानकासाठी सुरक्षा कर्मचारी नाहीत. विशेष म्हणजे, यापूर्वी बस स्थानकावर नियमितपणे पोलीस कर्मचारी तैनात असायचे. गेल्या काही महिन्यांत तेही दिसून येत नसल्याने, प्रवासी वर्गासह स्थानकाची सुरक्षा रामभरोसेच आहे. नूतनीकरणामुळे होती ती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सध्या बंद असून, ती अद्यावत केली जाणार आहे. स्थानिक पातळीवर देणगीदात्यांनी बस स्थानक आवारावर उभारलेला जलकुंभही बंद अवस्थेत आहे. बस स्थानकावर उपहारगृहाबरोबरच भेळभत्त्याची दुकानेही असून, यातील मालाच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांच्या तक्रारी नाहीत.
------------------------
हिरकणी कक्ष बंदच
बस स्थानकावर प्रथमोपचार पेटी नाही. मात्र, आगारात प्रथमोपचार पेटी उपलब्ध असून, गरजेवेळी त्याचा वापर केला जातो. स्तनपान कक्ष (हिरकणी कक्ष) नूतनीकरणामुळे सध्या बंद अवस्थेत असला, तरी नव्याने अद्यावत कक्ष उभारल्या जात आहे. याबराबेरच बस स्थानकावर आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, प्रकाशासाठी मोठे एलईडी बल्ब लावण्यात आले आहे. बस स्थानक स्वच्छतेसाठी एक कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आलेला असून, दर तासाला स्थानकाची स्वच्छता केली जाते.
----------------------
सद्यस्थितीला बस स्थानकाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. प्रवासी वर्गाला अधिक चांगल्या सुविधा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. बस स्थानकावर सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेकडून पोलीस पॉइंट म्हणून किमान दोन पोलीस नियमित असणे गरजेचे आहे. आपत्कालीन परिस्थितीत फोन केल्यावर पोलीस येतात.
- प्रशांत गुंड, आगार व्यवस्थापक (२० येवला बस)
200921\20nsk_1_20092021_13.jpg
२० येवला बस