वीज नसल्याने मनपा अंधारात
By Admin | Updated: May 29, 2014 00:48 IST2014-05-29T00:45:37+5:302014-05-29T00:48:47+5:30
कामकाज ठप्प : जनरेटरही झाले नादुरुस्त

वीज नसल्याने मनपा अंधारात
कामकाज ठप्प : जनरेटरही झाले नादुरुस्त
नाशिक : शहरात काल वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे विस्कळीत झालेल्या वीजपुरवठ्याचा फटका महापालिकेलादेखील बसला. आज दिवसभर महापालिकेला वीजपुरवठा होऊ न शकल्याने महापालिका कर्मचार्यांना अंधारातच कामकाज करावे लागले. विशेष म्हणजे महापालिकेचे जनरेटरही नादुरुस्त झाल्यामुळे कामगारांसह पदाधिकार्यांना अंधारात बसावे लागले.
शहरातील वीजपुरवठा अद्यापही विस्कळीतच असून, आज दिवसभर सर्वत्र विजेचा लपंडाव सुरू होता. विशेषत: सिव्हिल हॉस्पिटल, टिळकवाडी, शरणपूररोड, कॅनडा कॉर्नर आणि गंगापूरोड भागात आज दिवसभर वीजपुरवठा खंडित होता. सिव्हिल आणि सातपूर येथील उपकेंद्रांवर दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे या भागाला वीजपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे महापालिकेलादेखील वीजपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे आज विजेअभावी महापालिकेत कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. संगणक कक्षातून एकही कागद बाहेर पडला नाही, तर जे पदाधिकारी कामानिमित्त आपल्या दालनात आले त्यांना भ्रमणध्वनीच्या प्रकाशात काही काळ कामकाज करावे लागले. अधिकार्यांनी तर फाईलींना हातही लावला नसल्याचे बोलले जाते.
काल झालेल्या वादळीवार्यामुळे महापालिका आवारातील एक झाड मनपाच्या जनरेटवर पडल्यामुळे ते निकामी झाले आहे. आज सकाळपासून जनरेटर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले; मात्र काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी पदाधिकार्यांना अंधारातच बसावे लागले.
महावितरणची वीज तसेच मनपाचे जनरेटरही नसल्यामुळे महापालिकेला वीजपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे आज दिवसभर येथील कामकाज ठप्प होते. विजेअभावी कार्यालयांमध्ये अंधार असल्याने कर्मचार्यांनी कार्यालयाबाहेर उभे राहाणे पसंत केले. विद्युत विभागाकडून जनरेटर दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. मात्र सायंकाळपर्यंत जनरेटरच दुरुस्त न झाल्याने कोणत्याही कामकाजाविना आज महापालिकेचा दिवस पार पडला.(प्रतिनिधी)
मनपाला एकच जनरेटर
मनपा विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर आपल्या दालनात आल्यानंतर त्यांनी काहीकाळ वीज येण्याची वाट पाहिली. त्यानंतर त्यांनी आयुक्त कार्यालयाला विचारणा केली. महावितरणची वीज नसल्याने तसेच आपल्याकडील जनरेटर नादुरुस्त असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी विद्युत विभागाला याविषयी विचारणा केली असता महापालिकेकडे एकच जनरेटर असल्याचे आणि तेही झाड पडल्याने नादुरुस्त झाल्यामुळे ते सुरू करता येणे शक्य नसल्याची हतबलता विद्युत विभागाकडून दर्शविण्यात आली. यावेळी बडगुजर यांनी मनपाला पर्यायी जनरेटर नसल्याबद्दल आर्य व्यक्त करून याविषयी आपण आयुक्तांशी बोलणार असल्याचे सांगितले.