वक्त्यांची संख्या वाढल्याने गोेंधळ
By Admin | Updated: June 9, 2017 01:14 IST2017-06-09T01:13:43+5:302017-06-09T01:14:12+5:30
वक्त्यांची संख्या वाढल्याने गोेंधळ

वक्त्यांची संख्या वाढल्याने गोेंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी संपाचे केंद्रबिंदू ठरलेल्या नाशिकच्या तुपसाखरे लॉन्सवरील व्यासपीठावरील वक्त्यांची संख्या वाढल्याने संयोजक आणि नियंत्रकांमध्ये काही वेळा गोेंधळाचे प्रसंग निर्माण झाल्याचे चित्र होते. गोंधळाची सुरुवात कल्पना इनामदार या महिला वक्त्यापासून सुरू झाली.
चार-पाच भाषणे झाल्यानंतर सूत्रसंचालक हंसराज वडघुले यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या भाषणाची घोषणा करताच शेकापचे आमदार जयंत पाटील व डॉ. अजित नवले यांनी नाराजी व्यक्त केली. वडघुले व डॉ. अजित नवले यांनी माईक खेचून वक्त्यांची नावे जाहीर करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शेतकऱ्यांनी सर्वांना बोलू द्या, असा घोषवारा सुरू केल्यानंतर अशोक ढवळे, संजय मोरे, बाळासाहेब चव्हाण, विश्वनाथ पाटील, मनोज आथरे, सुशीला नरवडे यांच्यासह अन्य वक्त्यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांना बोलू देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यावेळी खासदार शेट्टींना त्यांच्या मनोगतातून आमचे गुरू माधवराव मोरे असून, माझ्यानंतर ते बोलणार असल्याचे सांगावे लागले. वक्ते बोलत असतानाच राजू देसले, हंसराज वडघुले, अजित नवले यांच्याकडे शेतकऱ्यांनी विविध मागण्यांच्या रूपाने शब्दश: चिठ्ठ्यांचा पाऊस पाडला. पोलिसांकडून छायाचित्रण
परिषदेसाठी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, देवरे यांच्यासह शंभर पोलिसांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंत्रणेकडून छायाचित्रणही केले गेले. तुपसाखरे लॉन्सकडील रस्ता वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला होता. कल्पना इनामदार या महिलेच्या भाषणावेळी झालेल्या गोेंधळानंतर या महिलेला महिला पोलिसांनी कडे करून सुरक्षित सोडले.