कोरोनामुळे पैठणीवरील मोरही नाचेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 18:02 IST2020-03-17T18:02:23+5:302020-03-17T18:02:57+5:30
ग्राहकांनी फिरविली पाठ : व्यवसाय अडचणीत, उलाढाल ठप्प

कोरोनामुळे पैठणीवरील मोरही नाचेना!
येवला : सर्वत्र पसरत असलेल्या कोरोना व्हायरसचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांबरोबरच आता येवल्यातील पैठणी व्यवसायालादेखील बसू लागला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे दक्षिण भारतासह इतर ठिकाणहून येणारा ग्राहकवर्ग बंद झाल्याने पैठणी उत्पादक व विक्र ेते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पैठणी उत्पादकही आता ‘गो- कोरोना’ म्हणू लागले असून, कोरोनामुळे पैठणीवरील मोरही नाचेनासे झाला आहे.
कोरोना व्हायरसची लक्षणे चीनसह आता भारतातही वाढत चालली आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर मोठा परिणाम झाला असून, येवल्यातील प्रसिद्ध अशा पैठणी व्यवसायाला त्याची झळ पोहोचली आहे. येवल्यात दररोज अनेक ग्राहक पैठणी खरेदीसाठी येत असतात. त्यात प्रामुख्याने, दक्षिण भारतातून येणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त असते. परंतु कोरोनाच्या भीतीने ग्राहकांनी येवल्याकडे पाठ फिरविल्याने पैठणी व्यवसायावर मोठी मंदीची लाट दिसून येत आहे. सध्या लग्नसराई असल्याने येथील पैठणी उत्पादक महागड्या पैठणी साड्यांचे उत्पादन करीत असून, मालाला उठावच नसल्याने पैठणी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. दुकानदाराकडून उत्पादनाला मागणी कमी झाल्याने पैठणी कारागिराला बसून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रोजंदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.