बाजारपेठेच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा भात पिकाकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST2021-09-19T04:15:55+5:302021-09-19T04:15:55+5:30

वसंत तिवडे लोकमत न्युज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या या तालुक्यातील शेतपिकांची मदार पावसाच्या ...

Due to the availability of market, farmers tend to grow paddy | बाजारपेठेच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा भात पिकाकडे कल

बाजारपेठेच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा भात पिकाकडे कल

वसंत तिवडे

लोकमत न्युज नेटवर्क

त्र्यंबकेश्वर : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या या तालुक्यातील शेतपिकांची मदार पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. २६,४०० हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, फक्त भात लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र बारा हजार हेक्टर आहे. शहरात भाताच्या अनेक जातींचे उत्पादन होत असल्याने याठिकाणी चार अद्ययावत राईस मिल असून, येथील तांदूळ खरेदी करण्यासाठी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जळगाव आदी भागातून व्यापारी, ग्राहक येत असतात.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वांत जास्त भात हेच नगदी पीक घेतले जाते. त्यासोबतच नागली, वरई, खुरसणी, उडीद व भुईमूग आदी खरीप पिकेदेखील घेतली जातात. मुळातच त्र्यंबकेश्वर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र डोंगर उताराचे व दऱ्याखोऱ्यांनी व्यापले आहे. साहजिकच मोठ्या प्रमाणात पाऊस असतो. येथील शेतजमिनी पावसावर अवलंबून आहे. तालुक्यात मोठी धरणे नसून लघुपाटबंधारे आहेत. साठवण तलाव आहेत, परंतु ते उन्हाळ्यात आटून जातात. गोदावरी नदीवर बेझे शिवारात गौतमी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. वायघोळपाडा अंबई, अंबोली, कोणे तळेगाव, अंजनेरी आदी ठिकाणी लघुपाटबंधारे आहेत. त्यामुळे भात, नागली, वरई, खुरसणी, उडीद, भुईमूग आदी क्षेत्र वगळता बागायत क्षेत्र अगदीच नगण्य आहे. त्यामुळे या तालुक्यात भात पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

भात खणणी व आवणीसाठी लागणारे मजुर हा सर्व खर्च करूनही वेळेवर पाऊसच झाला नाही किंवा भात सोंगणीपूर्वी अतिवृष्टी अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो.

खरीप शेती एकतर भरपूर उत्पन्न देते किंवा हातचे उत्पन्न नष्टही होत असते. मजुरी व खताचे भाव गगनाला भिडलेले असताना अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होत असते. त्यामुळे संरक्षण म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र उत्पन्न वाढल्याने विम्याची रक्कम बुडाली. त्यामुळे पीक विम्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही.

सुपीक जमिनी व मोठ्या जलाशयाच्या कार्यक्षेत्रात ज्यांच्या जमिनी आहेत असे शेतकरी बागायती व खरीप अशी दोन्हीही पिके घेतात. तालुक्याचे भागातील क्षेत्र थोडे असले तरी त्यात मुख्यत्वे टमाटे, द्राक्ष काही प्रमाणात ऊस, कोबी, भोपळा, वांगी, कांदा, बटाटे, कारले, दोडकी व काकडी अशा फळभाज्यांचे उत्पन्न मिळते. हा सर्व नगद माल असला तरी मार्केटमध्ये आवक वाढली की मालाला भाव कमी मिळतो. आज सहकारी संस्थांमध्ये कर्जासाठी भाताऐवजी टमाटे दाखविले जातात. कारण सहकारी सोसायट्यांकडून भाताला एकरी १७००, टमाटे २५०० व द्राक्षे एक लाख असे एकरी कर्ज दिले जाते. त्यामुळे अधिक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून भाताऐवजी टमाट्यांना प्राधान्य दिले जाते.

हल्ली शेती व्यवसाय बेभरवशाचा झाल्याने शेतकऱ्यांची मुले शिकून नोकरी, धंद्याच्या मागे लागली आहेत. घरची शेती विकून हाॅटेल व्यवसाय थाटले आहेत. काही जण नोकरी करतात तर तालुक्यात असेही काही उच्च शिक्षित तरुण आहेत की उच्च विद्याविभूषित होऊनही आपला वडिलोपार्जित शेती व्यवसायाला आधुनिक वळण देउन त्यांचे द्राक्ष एक्स्पोर्ट करीत आहेत.

त्र्यंबकेश्वर शहरात आतापर्यंत अवघा १२८६ मिमी पाऊस झालेला आहे. साठवण क्षमतेअभावी पावसाचे पाणी डोंगर उतारावरून गुजरात राज्याकडे वाहून जाते. आज तालुक्यात उद्योग, धंदा नसल्याने दरवर्षी निम्मा तालुका उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करीत असतो. हे स्थलांतर थांबविण्यासाठी औद्योगिक वसाहत होणे गरजेचे आहे. तसेच गडदुणे, कळमुस्ते व किकवी हे प्रकल्प झाल्यास तालुका सुजलाम् सुफलाम् होण्यास वेळ लागणार नाही.

Web Title: Due to the availability of market, farmers tend to grow paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.