मालेगाव महापालिका निवडणुकीवर ‘ड्रोन’ची नजर

By Admin | Updated: May 23, 2017 02:06 IST2017-05-23T02:06:39+5:302017-05-23T02:06:52+5:30

नाशिक : मालेगाव महापालिकेच्या मतदानाच्या दिवशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे़

Drone's eye on Malegaon municipal elections | मालेगाव महापालिका निवडणुकीवर ‘ड्रोन’ची नजर

मालेगाव महापालिका निवडणुकीवर ‘ड्रोन’ची नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानासाठी गत काही वर्षांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात इव्हीएम मशीनचा वापर केला जातो, तर मतदानाच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये शांततेत प्रक्रिया पार पडावी यासाठी पोलीस दल तैनात केले जाते़ मात्र, पोलिसांना काम करताना अडचणी लक्षात घेऊन मालेगाव महापालिकेच्या मतदानाच्या दिवशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे़ महापालिका निवडणुकीसाठी राज्यात पहिल्यांदाच ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सोमवारी (दि़ २२) पत्रकार परिषदेत दिली़
मालेगाव महापालिकेसाठी बुधवारी (दि़२४) मतदान होत असून, ८४ जागांसाठी ३७४ उमेदवार रिंगणात आहेत़ तर एक नगरसेवक निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडून आला आहे़ मालेगाव महापालिकेसाठी पूर्व व पश्चिम मालेगाव असे भाग असून, पूर्व भागात मुस्लीम संख्या अधिक तर पश्चिम मालेगावमध्ये हिंदूची संख्या अधिक आहे़ पूर्व भागातील काही मतदान केंद्रे ही संवेदनशील असून, तेथील मतदान केंद्रांसाठी जागेचे  आकारमान मतदारसंख्येच्या तुलनेने कमी आहे़ पूर्व मालेगावातील काही शाळांच्या मतदान केंद्रावर २६पर्यंत बुथची संख्या असल्याने अशा ठिकाणी एकाच वेळी गर्दी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़ मालेगाव शहरातील संवेदनशील व गर्दीचे ठिकाणच्या मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बल तैनात करण्यात आले आहेत़ याबरोबरच पोलिसांच्या मदतीसाठी चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे़ प्रत्येक ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली दृश्य ही पोलीस कर्मचाऱ्यांना लॅपटॉपवर दिसणार असून, गर्दीचा अंदाज येणार आहे़ या पोलिसांसमवेत स्थानिक रहिवासी असणार असून, गर्दीच्या ठिकाणची माहिती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष तसेच संबंधित ठिकाणी ड्यूटीवर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वायरलेस तसेच लाउडस्पीकरवरून दिली जाणार आहे़ या ड्रोन कॅमेऱ्यामुळे पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे़
राज्यात महापालिका निवडणुकांसाठी कायदा व सुव्यवस्था तसेच गर्दीवरील नियंत्रणासाठी ड्रोन कॅमेरे वापरले जाण्याची ही पहिलीच वेळ असून, तिचा वापर मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी केला जाणार आहे़ विशेष म्हणजे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आकाशातून अगदी गल्लीबोळापर्यंतची सूक्ष्म माहिती पोलिसांना उपलब्ध होणार आहे़ त्यामुळे या ड्रोनचा वापर पोलिसांना कशा प्रकारे लाभदायक ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़
प्रचारतोफा थंडावल्या
च्मालेगाव महापालिकेसाठी बुधवारी (दि. २४) मतदान होत असून, त्यासाठीच्या प्रचार तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मालेगाव मनपासाठी २१ प्रभागातून ८४ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. कॉँग्रेसचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यामुळे आता ८३ जागांसाठी मतदान होत आहे.

Web Title: Drone's eye on Malegaon municipal elections