वाहनचालकांनी सांकेतिक चिन्हे समजून घ्यावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 02:16 IST2021-01-25T23:27:44+5:302021-01-26T02:16:30+5:30
सिन्नर : वाहन चालविताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले सांकेतिक चिन्ह समजून घेणे व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन नाशिकचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांनी केले.

सिन्नर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहनचालकांचा प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी नाशिकचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, सिमंतिनी कोकाटे, संतोष मुटकुळे, सुनील म्हेत्रे, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक तडवी, योगेश मोरे आदी.
सिन्नर : वाहन चालविताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले सांकेतिक चिन्ह समजून घेणे व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन नाशिकचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांनी केले.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सिन्नर येथील कडवा विश्रामगृह येथे वाहनचालकांचा प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना भगत बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, मोटार वाहन निरीक्षक सुनील म्हेत्रे, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक तडवी, योगेश मोरे आदी उपस्थित होते.
नगरसेवक गोविंद लोखंडे यांनी दुचाकीवर मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. दुचाकीस्वारांनी दुचाकी चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रशांत शिंदे, योगेश शिंदे, राजू गवळी, सोमनाथ चांडोले यांचे सहकार्य लाभले.
यावेळी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सतीश भोर, सुनील गवळी, अण्णासाहेब वाजे, संपत फड, अशोक बर्के, संतोष वराडे आदींसह शिकाऊ उमेदवार, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गिकांचे महत्त्व समजून घ्यावे - सिमंतिनी कोकाटे
जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनी रस्त्यावरील अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगताना रस्त्यावरील मार्गिकांचे महत्त्व समजून घेतल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. चालकाने वेगमर्यादा आणि वाहतुकीच्या नियमाचे पालन केल्यास अपघात टळतील, असेही त्या म्हणाल्या.