मविप्रची आर्थिक कारभाराची श्वेतपत्रिका काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:02+5:302021-07-22T04:11:02+5:30
या संदर्भात ठाकरे यांनी समाजमाध्यमावर संस्थेच्या वाटचालीवर पोस्ट व्हायरल करून अनेक प्रश्न उपस्थित केले असून, त्यात म्हटले आहे की, ...

मविप्रची आर्थिक कारभाराची श्वेतपत्रिका काढा
या संदर्भात ठाकरे यांनी समाजमाध्यमावर संस्थेच्या वाटचालीवर पोस्ट व्हायरल करून अनेक प्रश्न उपस्थित केले असून, त्यात म्हटले आहे की, सभासदांच्या व इतर कोणत्याही व्यक्तीकडून विविध प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी फीसह लाखो रुपयांचे डोनेशन घेतले जाते, त्याचा नेमका विनियोग केला जातो का? सेवकांकडून गोळा केलेल्या कर्मवीर निधीचा नेमका वापर कशा करता केला जातो? गेल्या तीन वर्षापासून कोट्यवधी रुपये कर्मवीर निधीच्या नावे गोळा केली जात असली तरी, त्याच्या पावत्यासुद्धा सेवकांना दिल्या नाहीत असा आरोपही ठाकरे यांनी केला आहे. पूर्वीचे संस्थेवर ३० कोटी रुपये कर्ज असताना संस्थेतील विविध शाखांमध्ये असलेल्या २५ कोटी डिपॉझिटच्या रकमेवर कर्ज का घ्यावे लागते? जमिनींची खरेदी व अनावश्यक बांधकाम करणे, ज्या शाळांमध्ये दहा-पंधरा हजार स्क्वेअर फूटची गरज आहे. तेथे ८० हजार स्क्वेअर फूट इमारतीचे अनावश्यक बांधकाम करण्याचा प्रकार सुरू असल्याने संस्था कन्स्ट्रक्शन कंपनी झाली असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला आहे. संस्थेवरील कर्जाचा बोजा तसेच ठरावीक कंत्राटदारांना बांधकामाचे टेंडर फॉर्म देणे, मेडिकल स्टोअर्समध्ये कोरोनाकाळात सुरू असलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, रेमडीसिविर इंजेक्शनचा काळाबाजार, त्या अनुषंगाने काही सेवकांचे केलेले निलंबन व बदल्या पाहता संस्थेचा शतकोत्तर प्रवास ‘शतकीपार’ कोटी कर्जाकडे चालू असून, संस्थेचे सार्वभौमत्व टिकले पाहिजे तसेच अवाढव्य कर्जापासून संस्थेची मुक्तता झाली पाहिजे म्हणून संस्थेची आर्थिक श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली आहे.