जलवाहिन्यांमधून वाहते गटार : आजारांना निमंत्रण
By Admin | Updated: June 11, 2017 21:35 IST2017-06-11T21:33:33+5:302017-06-11T21:35:12+5:30
वडाळावासीयांना ‘काळ्या पाण्या’ची वारंवार शिक्षा

जलवाहिन्यांमधून वाहते गटार : आजारांना निमंत्रण
नाशिक : मागील महिन्यात वडाळागावातील तैबानगर परिसरात नळांमधून गटारीचे पाणी येत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर गावातील रझा चौक, झीनतनगर परिसरात नळांना गटारीचे पाणी येत असल्याने रहिवाशांनी महापालिकेच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. तुडुंब भरलेले ड्रेनेज आणि जुनाट जलवाहिन्यांमुळे वडाळावासीयांना वारंवार जणू ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा महापालिकेच्या उदासीनतेमुळे भोगावी लागत आहे.
महापालिकेच्या दैनंदिन पाणीपुरवठा योजनेबाबत अनेकदा तक्रारी कानी येत असतात. वडाळागावातील रझा चौक ते थेट रहेमतनगर आणि झीनतनगर, आलिशान सोसायटी, गणेशनगर, जय मल्हार कॉलनी, रामोशीवाडा या सर्व भागातील शेकडो कुटुंबांच्या नळांमधून चक्क सांडपाणी येत आहे. झीनतनगर येथे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यामधील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून गटारीचे काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळाले. सुमारे पंधरवड्यापासून या भागात गढूळ नव्हे तर थेट गटारीचे सांडपाणी नळांना येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दूषित पाणीपुरवठ्यामुळे परिसरातील बहुतांश कुटुंबातील लहान मुलांपासून तर महिलांपर्यंत सर्वांना थंडी-ताप, अतिसार, उलट्या, अंगदुखी यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे.