सुरगाणा : तालुक्यातील पांगारणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका मिळावी यासह विविध मागण्यांसाठी येथील आदिवासी बांधवांनी पंचायत समितीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले.या धरणे आंदोलनप्रसंगी भारतीय आदिवासी पँथरचे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम खोटरे उपस्थित होते. आदिवासी लाभार्थींना देण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांमधील भ्रष्टाचार, अनुदान वेळेवर न मिळणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या कित्येक महिन्यांपासून रुग्णवाहिका नाही, घरकुल, शौचालय, टीएसपी विहिरींची कामे पूर्ण होऊनदेखील अनुदान मिळत नाही. त्याचप्रमाणे आदिवासी समाजामध्ये होणारी घुसखोरी, आदिवासी कसत असलेल्या वन-जमिनींबाबत शासनाच्या भूमिकेला विरोध करून वनहक्क कायद्याची पारदर्शी अंमलबजावणी करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा. घरकुल योजनेचा लाभ सर्वसामान्य गरीब जनतेला मिळावा आदी मागण्यांबाबत हे धरणे आंदोलन आहे.सर्व मागण्या त्वरित पूर्ण करून आदिवासी बांधवांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी तुळशीराम खोटरे यांनी केली. यावेळी दलित पँथरचे पदाधिकारी कैलास सूर्यवंशी आदींसह परिसरातील आदिवासी बांधव उपस्थित होते.
आदिवासी बांधवांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 01:11 IST