शहरातील गुन्हेगारीत दुपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:34 IST2020-06-16T22:49:56+5:302020-06-17T00:34:05+5:30
नाशिक : ( अझहर शेख )कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल केले गेले आहे. सरकारकडून पुन्हा जनजीवन पूर्वपदावर आणले जात असताना शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मे महिन्यात मात्र गुन्हेगारी ‘अनलॉक’ झाल्याचे दिसून येत आहे.

शहरातील गुन्हेगारीत दुपटीने वाढ
नाशिक : ( अझहर शेख )कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल केले गेले आहे. सरकारकडून पुन्हा जनजीवन पूर्वपदावर आणले जात असताना शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मे महिन्यात मात्र गुन्हेगारी ‘अनलॉक’ झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिलच्या तुलनेत गेल्या महिन्यात गुन्हेगारीचा आलेख उंचावला. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा राज्यापाठोपाठ केंद्र सरकारकडून केली गेली आणि नागरिक आपापल्या घरात बंदिस्त झाले. रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला, गजबजणाऱ्या बाजारपेठा ओस पडल्या सर्व व्यवहार ठप्प झाले आणि सर्वत्र ‘लॉकडाऊन’ दिसून आले. यामुळे हळूहळू मार्च व एप्रिलमध्ये घात, अपघातासोबत अन्यप्रकारची गुन्हेगारीसुद्धा ‘लॉक’ झाल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत होते. या लॉकडाऊनच्या काळात शहर गुन्हे शाखेने काही सराईत गुन्हेगारांच्या मुसक्यासुद्धा बांधल्या; मात्र जेव्हापासून अनलॉकची घोषणा झाली आणि राज्यात सर्वत्र लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून पुन्हा गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
एप्रिलमध्ये शहरात तीन प्राणघातक हल्ले झाले, तर मे महिन्यात या प्रकाराचे नऊ गुन्हे घडले. शहरात एप्रिलमध्ये दोनवेळा जबरी चोरीचा गुन्हा घडला, तर मे महिन्यात दहा जबरी चोरीचे गुन्हे घडले. घरफोड्यांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये आणि अनलॉकमध्ये सारखेच राहिल्याचे दिसते. तसेच अपहरणाचे प्रकार आणि रस्ते अपघाताच्या दुर्घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसते.
चालू महिन्याच्या पंधरवड्यातसुद्धा हाणामारी, बलात्कार, विनयभंग, घरफोडी, वाहनचोरीसारख्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. तसेच वाहनांची जाळपोळ, तोडफोड, दंगलीसारखे गुन्हेसुद्धा घडले आहेत. जाखोरीमध्ये, तर पतीने पत्नीची कोयत्याने हत्त्या केल्याचे उघडकीस आले.
-------------------------
महिला
सुरक्षेचा
प्रश्न गंभीर
लॉकडाऊन काळात
महिलांवरील हिंसाचाराबाबत जनजागृतीचा प्रयत्न केला गेला मात्र १९ विनयभंगाच्या, तर दहा बलात्काराच्या घटना आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्या. तसेच अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे दहा प्रकार समोर आले.
-------------------
रस्ते अपघातात
१४ लोकांचा मृत्यू
लॉकडाऊन काळात रस्ते अपघाताचे प्रमाण अगदी नगण्य झाले होते; कारण अत्यावश्यक सेवेतील वाहनांचा अपवाद वगळता रस्त्यांवरून सर्व प्रकारची वाहने गायब झाली होती; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा अपघातांचे सत्र सुरू झाले. अपघातात १४ लोकांचे प्राण मे महिन्यात गेले. एप्रिलमध्ये अपघातात केवळ तीन लोकांचा मृत्यू झाला होता.
---------------
पोलीसगस्तीचा होता धाक
नाशिक शहरात लॉकडाऊन काळात सातत्याने पोलिसांची गस्त सुरू होती. पोलीस वाहनांच्या उद््घोषणा सुरू होत्या. यामुळे पोलिसांचा धाक निर्माण झाला होता; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पोलीसग्रस्तीचे प्रमाणही कमी झाले; यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येते. २४ तास शहरातील रस्त्यांवर पोलीस दिसत होते. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि पोलीस नजरेस पडत असल्यामुळे गुन्हेगारांना जरब बसला होता.