महापालिकेच्या बससेवेला महिनाअखेर डबलबेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:29+5:302021-02-05T05:40:29+5:30
नाशिक महापालिकेच्या बससेवेच्या शुभारंभाचे अनेक मुहूर्त मुक्रर करूनही या ना कारणाने ही सेवा लांबणीवर पडत असून, परिणामी राज्य परिवहन ...

महापालिकेच्या बससेवेला महिनाअखेर डबलबेल
नाशिक महापालिकेच्या बससेवेच्या शुभारंभाचे अनेक मुहूर्त मुक्रर करूनही या ना कारणाने ही सेवा लांबणीवर पडत असून, परिणामी राज्य परिवहन महामंडळाने या बससेवेच्या भरवशावर शहरालगतच्या ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या कमी वा बंद केल्याची तक्रार केली जात आहे. त्याचे पडसाद शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उमटले. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी हा प्रश्न उपस्थित करून, सिन्नरहून नाशिक शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसफेऱ्या कमी करण्यात आल्या असून, महामंडळाकडून नाशिक महापालिकेकडे बोट दाखविले जात आहे. त्यामुळे महापालिकेची बससेवा सुरू कधी होणार, असा प्रश्न आयुक्त कैलास जाधव यांना विचारला. त्यावेळी जाधव यांनी शासनाच्या परिवहन महामंडळाकडे परवान्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, येत्या आठ दिवसात परवाना प्राप्त होईल व त्यानंतर साधारणत: महिनाअखेर ही सेवा सुरू होईल. पहिल्या टप्प्यात ५० टक्के बस सुरू होतील व त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात १०० टक्के ही सेवा सुरू केली जाईल. शहरालगतच्या आडगाव, ओेझर, सिन्नर, दिंडोरी या ग्रामीण भागातही ही सेवा सुरू करण्यात येईल. तसेच जानोरी विमानतळावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमानांच्या वेळा पाहून मिनी बस सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही जाधव यांनी दिली.
चौकट===
स्मार्टसिटीत वीजतारा भूमिगत
शहरात लोंबकळणाऱ्या वीजतारांचा प्रश्न गंभीर असून, अनेकांचे यामुळे जीव गेले आहेत. या तारा भूमिगत करण्यासाठी येणारा खर्च पेलण्याची कुवत वीज कंपनीची नाही. त्यामुळे शहर स्मार्ट होत असताना त्यात वीजतारा भूूमिगत करण्याचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यावर आयुक्त कैलास जाधव यांनी स्मार्ट सिटीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.