औष्णिक वीज केंद्रात श्वान पथक तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:39 IST2018-08-22T00:39:18+5:302018-08-22T00:39:35+5:30
येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र परिसर व कामगार वसाहतीच्या सुरक्षेसाठी सध्या असलेल्या सुरक्षा यंत्रणेव्यतिरिक्त सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी श्वान पथकही तैनात करण्यात आले आहे.

औष्णिक वीज केंद्रात श्वान पथक तैनात
एकलहरे : येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र परिसर व कामगार वसाहतीच्या सुरक्षेसाठी सध्या असलेल्या सुरक्षा यंत्रणेव्यतिरिक्त सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी श्वान पथकही तैनात करण्यात आले आहे. एकलहरे वसाहतीत स्वत:ला भाई म्हणून फेमस होण्यासाठी एका युवकाने काही दिवसांपूर्वी स्वत:वर गोळीबार घडवून आणला होता. या घटनेमुळे एकलहरे वसाहतीतील नागरिकांत भीतीचे सावट निर्माण झाले तर एकलहरे औष्णिक वीज केंद्राच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला होता. या घटनेची दखल घेत मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी एकलहरे वसाहत व वीज केंद्र परिसराची सुरक्षा व्यवस्था कडक केली. चेमरी नंबर एकचे गेट क्रमांक एक व सिद्धार्थनगर जवळील नवीन डी टाइपचे गेट नंबर दोन येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांची, वाहनांची, एस.टी. बसेसची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे अनावश्यक ये-जा करणारे व आगंतुकांना आळा बसण्यास मदत झाली. परंतु एकलहरे वीज केंद्राच्या सुरक्षिततेचा विचार करता १८ आॅगस्टपासून परिसरात श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक किशोर फडतरे यांच्या नियंत्रणाखाली श्वान पथक कार्यरत असून, त्यात प्रशिक्षित डॉबरमॅन व किंगकोब्रा जातीच्या श्वानांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रशिक्षित कर्मचारीही आहेत. हे श्वानपथक वीज केंद्र व रहिवासी कॉलनी व्यतिरिक्त वसाहतीबाहेरील सिद्धार्थनगर, हनुमाननगर, देशमुखवाडी, पहाडीबाबा झोपडपट्टी, एकलहरे गाव, वीज केंद्राची चहुबाजूची संरक्षक भिंत, एकलहरे बंधारा, गंगावाडी परिसर या भागात गस्त घालेल. या प्रशिक्षित श्वान पथकामुळे भुरट्या चोºया व संशयित इसमांना आळा बसेल.